FACT CHECK: राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले नव्हते का?

False राजकीय | Political

इस्टर संडे या ख्रिस्ती धर्माच्या सणाच्या दिवशी रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण जगाला हेलावून टाकले. तीन चर्च आणि तीन हॉटेल्समध्ये झालेल्या या हल्ल्यात 300 हुन अधिक लोक मृत पावले तर, जखमींचा आकडा 500 हून अधिक आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करून या हल्ल्याचा निषेध नोंदविला. या ट्विटवरून अनेकांनी त्यांच्यावर पुलवामा हल्ल्याच्यावेळी असे दुःख व्यक्त न केल्याची टीका केली. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांचे श्रीलंकेतील हल्ल्याबद्दलचे ट्विट दिले आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले की, श्रीलंकेत घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेने माझं मन व्यथित झालं आहे. या घटनेचा मी निषेध नोंदवत आहे. श्रीलंकावासीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. (मूळ ट्विट)

या ट्विटचा आधार घेत पोस्टमध्ये आरोप करण्यात आला की, भारतात पुलवामा हल्ला झाला तेव्हा दुःख व्यक्त करायचं सोडून यांनी (राज ठाकरे) शत्रुपक्ष पाकिस्तानची बाजू घेत यात मोदींचा हात असल्याचे आरोप केले होते आणि आता श्रीलंकेत झालेला हल्ला पाहुन यांचं मन व्यथित होतंय!

मग राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याच्या वेळी दुःख व्यक्त केलं नव्हते का?

तथ्य पडताळणी

काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यावेळी जगभरातील नेत्यांनी भारताच्या दुःखात सामील असल्याच्या प्रतिक्रिया देत दहशतवादाचा सामना करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल काही प्रतिक्रिया दिली होती का, हे पाहण्यासाठी आम्ही त्यांचे ट्विटर अकाउंट तपासले. तेव्हा आम्हाला खाली दिलेले ट्विट आढळले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत ते म्हणाले की, पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे.

इंग्रजी ट्विटअर्काइव्ह

माध्यमांनीदेखील त्यांच्या या प्रतिक्रियेच्या बातम्या दिल्या होत्या.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

पुलवामा हल्ल्यानंतर विविध नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे न्यूज-18 लोकमतने संकलन केले होते. त्यामध्ये राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेचासुद्धा समावेश आहे. ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राज ठाकरे म्हणतात’ अशा मथळ्याच्या तीन मिनिटांच्या व्हिडियोमध्ये तुम्ही 2.07 ते 2.21 दरम्यान राज ठाकरेंची प्रतिक्रिया दिलेली आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – न्यूज-18 लोकमत

पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी ट्विट करून वायू सेनेचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहिले की, भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो. सकाळ दैनिकानेदेखील याची बातमी केली होती.

इंग्रजी ट्विटअर्काइव्हसकाळ

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेदेखील भारतावर हल्ला करण्यासाठी विमाने पाठविली होती. त्यांना हुसकावून लावताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या भूमीत कोसळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळीसुद्धा राज ठाकरे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली की, आपला वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे. तो लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो.

इंग्रजी ट्विटअर्काइव्ह

पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्यानंतर त्यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन हे सुखरूप परत आले ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे. अभिनंदन ह्यांनी ज्या शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असे त्यांनी ट्विट केले होते.

इंग्रजी ट्विटअर्काइव्ह

यावरून हे स्पष्ट होते की, राज ठाकरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर वेळोवेळी प्रतिक्रिया देत शहीदांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटलेले आहे. तसेच या भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले होते.

मग पुलवामा हल्ल्यामध्ये मोदींचा हात असल्याचे त्यांनी म्हटले का?

राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर येथे 25 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील 40 शहीद जवान हे राजकीय बळी असल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची चौकशी केल्यास या हल्ल्यामागील ‘सत्य’ बाहेर येईल असेही त्यांनी वक्तव्य केले होते.

यासंदर्भातील बातम्या येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्सद एशियन एजदिव्य मराठीलोकमतसकाळ

या भाषणाचा संपूर्ण व्हिडियो तुम्ही टीव्ही 9 च्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता. यामध्ये 7.27 मिनिटांपासून पुढे राज ठाकरे शहीद जवान राजकीय बळी ठरल्याचे विधान करतात. यामध्ये त्यांनी मोदींनी हा हल्ला घडविला असे म्हटलेले नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी सरकारकडून निवडणुकीच्या सुरुवातीला आणि मध्यावर पुलवामा हल्ल्यासारखं मोठं काहीतरी घडवलं जाईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. गेल्या साडेचार वर्षांतील प्रश्नांवरून मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे केले जाईल, असे ते म्हणाले होते. राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या सूचनांकडे सरकारचे दुर्लक्ष या मुद्यांवरून प्रश्न उपस्थित केले होते.

यासंदर्भातील बातम्या येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाएनडीटीव्ही

निष्कर्ष

राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांनी श्रीलंकेतील हल्ल्यांबाबत दुःख व्यक्त केले; पण पुलवामाच्या वेळी नाही, असे विधान असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले नव्हते का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False