मराठा आंदोलनात बॉम्बस्फोटच्या कटाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Missing Context राजकीय

जालनातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी जाळपोळ आणि पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावदेखील उद्भवला. 

या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या एका बातमीचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. या बातमीत म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठान संस्थेने मराठा आंदोलनात गावठी बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटकसुद्ध केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी सध्याची नाही. 2018 मधील हे प्रकरण आहे. 

काय आहे दावा ?

लोकपत्रक वृत्तपत्रातील “मराठा आंदोलनात गावठी बॉम्बचे स्फोट घडवण्याचा सनातन आणि शिवप्रतिष्ठानने रचला होता कट” या मथळ्याची बातमी व्हायरल पोस्टमध्ये दिलेली आहे. 

या बातमीनुसार, “मुंबई – नालासोपारा – पुणे – सांगली – कोल्हापूर तसेच औरंगाबाद मधून पकडण्यात आलेल्या सनातन आणि भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचा मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट होता. या प्रकणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर हे मुख्य आरोपी असून पोलिसांनी तिघांकडून मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणार साहित्य आणि जिवंत काडतुस जप्त केली आहेत. स्फोट करून आंदोलन विस्कळीत करने हा त्यांचा उद्देश होता.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी 

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, ही बातमी पाच वर्षांपूर्वीची आहे.

एबीपी माझाने 11 ऑगस्ट 2018 रोजी बातमी दिली होती की, “महाराष्ट्रात चार प्रमुख शहरांमध्ये घातपाताचा कट रचनाऱ्या आरोपींना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. हे आरोपी हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असून वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर असे त्यांची नावे आहेत. एटीएसने त्यांच्याकडून तब्बल 20 देशी बॉम्ब जप्त केले.”

खालील बातमीमध्ये आपण वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांचे फोटो पाहू शकतात. 

लोकसत्ताच्या 16 ऑगस्ट 2018 रोजीच्या बातमीनुसार या प्रकरणाच्या चौकशीतून माहिती समोर आली की, पकडले गेलेले आरोपी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथील मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट रचत होते. मात्र हा स्फोट मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात येणार होता. तसेच या स्फोटाची तिव्रता कमी असणार होती, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा स्फोट करण्यात येणार होता, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

यावरून सिद्ध होते की, मराठा आंदोलनात गावठी बॉम्बचे स्फोट घडवण्याचा कट रचल्या घटना पाच वर्षांपूर्वीची आहे. या प्रकरणाचा सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनाशी किंवा त्यानंतर झालेल्या उद्रेकाशी संबंध नाही. 

सध्याची परिस्थिती

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली गावात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर अनेक ठिकाणी दंगलीचे वातवरण निर्माण झाले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, तसेच काही ठिकाणी बंद पाळण्यात आले होते.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं सांगणाऱ्या सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता आणखी खालावली आहे. सत्ताधारी आणि विपक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठित करण्यात आली आहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ व तज्ज्ञ वकिलांचा कृतीगट (टास्क फोर्स) स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगितले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, मराठा आंदोलनात गावठी बॉम्बचे स्फोट घडवण्याची बातमी पाच वर्षे जुनी आहे. ‘लोकपत्रक’ या वृत्तपत्राने ही 2018 मध्ये छापली होती. सध्याच्या मराठा आंदोलनाचा या बातमीशी काही संबंध नाही. चुकीच्या दाव्यासह बातमी व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मराठा आंदोलनात बॉम्बस्फोटच्या कटाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Missing Context


Leave a Reply