अभिनेता शाहरुख खान चार वर्षांच्या खंडानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पुढील वर्षी शाहरुखचे पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पैकी ‘जवान’ सिनेमाचे औरंगाबादजवळील बिडकीन येथे चित्रिकरण सुरू आहे.

सोशल मीडियावर बिडकीन येथे शाहरुख खानच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही उत्साही चाहत्यांनी तर शाहरुख तेथे पोहचला असा फोटोसुद्धा शेअर केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो चार वर्षांपूर्वीचा आहेत. जुना फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर होत आहे.

काय आहे दावा?

विमानतळावरील शाहरुखचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, “औरंगाबादच्या बिडकीन, येथे शाहरुखचे आगमन.”

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, शाहरुखचा हा फोटो 2018 मधील आहे.

एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, शाहरुख खान वसई येथे ‘झीरो’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी हेलिकॉप्टरने आला तेव्हाचा हा फोटो आहे. वांद्रे येथील त्याचे घर ते वसई असे तीन तासांचे अंतर जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तो हेलिकॉप्टरचा वापर करीत होता.

मूळ पोस्ट – एनडीटीव्ही

मुंबईतील वाहतूककोंडीला टाळण्यासाठी शाहरुख खान हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचे ठरविले होते, अशी मिड डे वृत्तपत्राने बातमी दिली होती.

शाहरुख खानच्या चाहत्याने वसई येथील हेलिपॅडवरील इतर फोटोदेखील शेअर केले होते.

सोबत कॅप्शन दिली आहे की, झीरोच्या सेटवर शाहरुख खान.

https://www.instagram.com/p/BhGqgybh5Rr/

औरंगाबादमध्ये ‘जवान’चे चित्रकरण

औरंगाबादजवळील बिडकीन येथील एमआयडीसी भागात शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाचे चित्रिकरण होणार आहे. मागच्या दोन महिन्यांपासून शुटिंगची तयारी सुरू असून चित्रिकरणस्थळावर सर्व उपकरणे दाखल झाले आहेत.

शुटिंगची माहिती पसरताच बिडकिन येथे तुफान गर्दी लोटली. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते दिवसभर चित्रिकरणस्थळी ठाण मांडून बसलेले आहेत. तसेच सोशल मीडियावर शुटिंगचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा शेअर करीत आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, शाहरुख खानचा चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो औरंगाबादमध्ये ‘जवान’च्या शुटिंगसाठी तो दाखल झाल्याच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो शाहरुख खान औरंगाबादमध्ये दाखल झाला म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar

Result: False