सौदी अरेबियाच्या फुटबॉल खेळाडुंना 10 कोटींची ‘रोल्स रॉईस’ मिळाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वांना चकित करत सौदी अरेबिया संघाने बलाढ्या अशा अर्जेंटिना संघाला 2-1 ने पराभूत केले. त्यामुळे लियोनल मेस्सीच्या संघावर मात करण्याची कामगिरी करणाऱ्या या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अशातच सगळीकडे चर्चा पसरली की, सौदी अरेबियाच्या विजयामुळे आनंदून गेलेले राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडुला दहा कोटी रुपयांची आलिशान ‘रोल्स रॉईस’ कार भेट देणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, आणि जनसत्ता अशा अनेक वेबसाईट्सने कार भेट देण्याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) या दाव्याविषयी फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा सौदीच्या खेळाडुंना कार भेट देण्याची बातमी निव्वळ अफवा आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अर्जेंटिना संघाला ‌सौदी अरेबियाने 2-1 असे पराभूत करत खळबळ उडवून दिली. सौदी अरेबियाच्या या विजयाने त्यांचे सरकार भलतेच खूष झाले असून प्रत्येक खेळाडूंना मोठी भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. मोहम्मद बिन सलाम अल सउद यांनी सर्व खेळाडूंना रोल्स रॉयस फँटम कार देण्याची घोषणा केली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताऴणी

माध्यामांनी दिलेल्या बातम्या बारकाईने वाचल्यावर लक्षात येते की, रोल्स रॉईस गाडी भेट देण्याची अधिकृत घोषणा कोणी व कुठे केली याची माहिती दिलेली नाही. 

याबाबत ना सौदी अरेबियाच्या फुटबॉल संघाच्या ना सौदी अरेबियाच्या सरकारच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. 

मग खरं काय आहे?

अर्जेंटिनासोबतच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सौदी अरेबिया संघाचा कर्णधार सलमान अल-फराज याने रोल्स रॉईस कार भेट मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फराजने म्हटले की, “गाडी गिफ्ट मिळाल्याचे वृत्त खरं नाही. आम्ही केवळ आमच्या देशसेवेसाठी खेळत असून, ती आमच्यासाठी सर्वात मौल्यवान भेट आहे.”

सौदी अरेबिया संघाचे मुख्य प्रशिक्षक हार्वे रेनार्ड यांनीदेखील राजकुमार मोहम्मद बिन सलमान संघातली खेळाडुंना गाडी भेट देणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना त्यांनी सांगितले की, “ही निव्वळ अफवा आहे. सौदी फुटबॉल फेडरेशन आणि क्रीडा मंत्रालय केवळ खेळाप्रती गंभीर आहेत आणि या क्षणी आम्ही काहीतरी ‘भेट’ मिळवण्यासाठी खेऴत नाही आहोत.”

मूळ बातमी – एनडीटीव्ही

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, सौदी अरेबिया फुटबॉल संघातील खेळाडुंना रोल्स रॉईस कार गिफ्ट दिली जाणार असल्याची बातमी निराधार आहे. सौदी संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक दोघांनीही अशी काही घोषणा झाली नसल्याचे सांगितले आहे. (तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सौदी अरेबियाच्या फुटबॉल खेळाडुंना 10 कोटींची ‘रोल्स रॉईस’ मिळाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading