पुरामध्ये हरणाला वाचविणाऱ्या त्या ‘बाहुबली’चे फोटो बांग्लादेशातील; वाचा सत्य

False सामाजिक

आसाममध्ये सध्या महापुराने थैमान घातले आहे. या पूर परिस्थितीचे म्हणून अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. एका किशोरवयीन मुलाने आसाममध्ये पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून हरणाच्या एका गोंडस बछड्याला वाचविले, अशा दाव्यासह काही फोटो शेयर होत आहेत. लोक त्याला ‘आसामचा बाहुबली’ म्हणत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता हे फोटो 2014 साली बांग्लादेशमध्ये आलेल्या पूराचे आहेत, असे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर समोर आले की, हा फोटो आसाम पूराचे नाहीत. हे फोटो बांग्लादेशामध्ये 2014 साली आलेल्या पूराचे आहेत.

डेलिमेल यूके वेबसाईटवर 6 फेब्रुवारी 2014 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, या मुलाचे नाव बिलाल आहे. बांग्लादेशातील नावोखाली येथे आलेल्या पुरामध्ये हरणाचे एक गोंडस बछडे वाहून जात होते. हे पाहताच या मुलाने मोठ्या धाडसाने पाण्यात उडी मारून या हरणाला वाचवले. डोके पाण्यात बुडालेले असतानाही या मुलाने हरणाला पाण्याच्या वरच ठेवले.

मूळ बातमी येथे वाचा – डेलिमेल यूकेअर्काइव्ह

वन्यजीवांचे छायाचित्रकार हसिबुल वहाब यांनी या मुलाची वीरता कॅमेऱ्यात टिपली आणि जगासमोर आणली होती. पूर आलेल्या नदीत स्वतःचा जीव धोक्यात घालून या मुलाने हरणाला वाचविल्याचे सर्वत्र कौतुक झाले होते.

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या मुलाच्या पराक्रमाची दखल घेतली होती. 

विशेष म्हणजे बांग्लादेशातील हे फोटो भारतातील म्हणून शेयर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2016 साली तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आसाममध्ये पूरपरिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आसामा सरकारने पूरस्थितीचा आढावा असणारा अहवाल त्यांना सुपूर्द केला. या अहवालातदेखील बांग्लादेशातील या मुलाचे फोटो समाविष्ट करण्यात आले होते. आसाम सरकारनेदेखील ही चूक मान्य केली होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, आसामचा बाहुबली म्हणून व्हायरल होणारा फोटो एक तर जुना आहे आणि दुसरे म्हणजे तो बांग्लादेशातील आहे. तेथे 2014 साली आलेल्या पूरात एका मुलाने या हरणाचा जीव वाचविला होता. ते चुकीच्या माहितीसह आसामामधील असल्याचे फिरवले जात आहेत.

Avatar

Title:पुरामध्ये हरणाला वाचविणाऱ्या त्या ‘बाहुबली’चे फोटो बांग्लादेशातील; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False