भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकारण | Politics

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी 29 नोव्हेंबर रोजी वलसाड जिल्ह्यात एका रॅलीमध्ये भाषण करताना बंगाल विषयक वादग्रस्त विधान केले होते. 

“गॅस सिलेंडरचे काय करणार? बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. परेश रावल यांनी शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत माफीसुद्धा मागितली. 

या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये परेश रावल यांनी लोकांनी घेरले असून, ते लोकांची माफी मागिताना दिसतात. 

दावा केला जात आहे की, गुजरात निवडणुकीदरम्यान जनतेने परेश रावल यांचा निषेध करत विरोध केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल व्हिडिओ यंदाच्या गुजरात निवडणुकीदरम्यानचा नसून, पाच वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये परेश रावल यांना लोकांनी घेरल्याचे दिसते. सोबत लिहिलेले आहे की, “गुजरातमध्ये बीजेपीचा प्रचार करत असताना अभिनेता परेश रावला यांना जनते ने घेरले. परेश रावल यांनी लोकांची माफी मागितली परंतु मतदारांनी त्यांचे ऐकले नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ संबंधित कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडिओ नीट ऐकल्यावर लक्षात येते की, लोक परेश रावल यांना राजपूत समाजाची माफी मागण्यास सांगत आहेत आणि सध्या बंगालविषयक वादग्रस्त विधानाचा विषय आहे.

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, परेश रावल यांनी 2017 मध्ये तत्कालिन विधानसभा निवडणुकीच्या काळात सरदार पटेल यांनी भारतातील ‘मर्कट’ राजे-महाराजांना वठणीवर आणले होते असे विवादस्पद विधान केले होते. 

या वादग्रस्त विधानानंतर परेश रावल यांचा खूप विरोध झाला राजपुत समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वक्तव्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली होती.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 

लोकसत्ताच्या बातमीनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार सभेमध्ये रावल म्हणाले होते की, “सध्या गॅस सिलेंडर महाग आहे, त्याची किंमत कमी होईल, लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमधील जनता महागाईचा सामना करेल. पण समजा बाजूच्या घरात रोहिंग्या शरणार्थी किंवा बांगलादेशी आले तर त्या स्वस्त गॅस सिलेंडरचे काय करणार? त्या बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?”  

या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीका होऊ लागल्यानंतर परेश रावल यांनी ट्विटरवर लोकांची माफी मागितली होती.

माफी मागताना परेश रावल म्हणाले की, “मासे खाणं हा मुद्दा नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली फक्त अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाच संबोधून म्हणालो होतो. तरी आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, परेश रावल यांचा माफी मागतानाच व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा असून सध्याच्या गुजरात निवडणुकीशी त्याचा संबंध नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading