
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपी सहा डिसेंबर रोजी पहाटे पोलिस चकमकीत ठार झाले. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या चकमकीत त्यांना ठार करण्यात आले. सोशल मीडियावर या “एन्काउंटर”चा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. अनेक मीडिया वेबसाईटनेसुद्धा हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींचा फोटो म्हणून हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील व्हायरल फोटो 2015 साली तिरुमला येथील जंगलात पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या चंदन तस्करांचा असल्याचे आढळले.
फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर द हिंदू वेबसाईटवरील 7 एप्रिल 2015 रोजीच्या बातमीत हा वापरण्यात आल्याचे दिसले. या बातमीनुसार, तिरुमला येथील शेषाचेलम जंगलात 2015 साली एप्रिल महिन्यात झालेल्या चकमकीत 20 चंदन तस्कर ठार झाले होते. चंदन तस्करांविरोधात लढा देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सनी ही कारवाई केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलामध्ये सुमारे 100 तस्करांची टोळी चंदनाची झाडे तोडत होती. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले परंतु, त्यांनी हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदू
कोस्टल डायजेस्ट वेबसाईटनुसार, हे तस्कर तमिळनाडूतील होते. तमिळ बहुल भागात या कारवाईविरोधात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आले होते काही ठिकाणी बसेसदेखील जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री चंद्रबाबून नायडू यांनी केंद्राला रिपोर्ट दिला होता.
हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटर स्थळी सायबराबाद पोलिस तपासणी करतानाचा फोटो एएनआयने ट्विट केलेला आहे. त्यामध्ये पोलिसांच्या वर्दीवर असणारा बिल्ला आणि व्हायरल होत असलेल्या फोटोतील पोलिसांच्या वर्दीवरील बिल्ला एकमेकांपासून एकदम वेगळा आहे. एन्काउंटर तेलंगणामध्ये झाले तर, व्हायरल फोटोतील चकमक आंध्र प्रदेशमध्ये झाली होती.

निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचे एन्काउंटर म्हणून पसरविला जाणारा फोटो मूळात 2015 आंध्र प्रदेशमध्ये चंदन तस्करांच्या एन्काउंटरचा आहे. अनेक मीडिया वेबसाईटने तो चुकीच्या पद्धती शेयर केला आहे.

Title:हैदराबाद सामूहिक बलात्काराच्या आरोपींचे एन्काउंटर म्हणून 2015 मधील जुना फोटो व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
