
हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेची हेल्पलाईन म्हणून 9969777888 हा क्रमांक फिरत आहे. महिलांनी रात्री रिक्षा किंवा टॅक्सीतून एकट्याने प्रवास करताना सदरील वाहनाचा क्रमांक 9969777888 या नंबरवर एसएमएस करावा. त्यानंतर त्या वाहनावर “GPRS” द्वारे लक्ष ठेवण्यात येईल. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
महाराष्ट्र पोलिलांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटले की, सर्व महिलांना रात्री ऑटो किंवा टैक्सीने एकट्याने प्रवास करावा लागल्यास त्या ऑटो किंवा टैक्सी चा नंबर 9969777888 ह्या नंबरवर SMS करा आपल्या मोबाईल फोन वर एक मेसेज येईल एक्नॉलेजमेंटचा आणि आपल्या मोबाईल द्वारे त्या वाहनवर GPRS द्वारे नजर ठेवली जाईल. जास्तीत जास्त शेअर करुन जन जाग्रुती करा.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील क्रमांक जेव्हा गुगलवर सर्च केला असता कळाले की, मुंबई पोलिसांनी ही हेल्पलाईन 2014 मध्ये सुरू केली होती. मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे 2017 मध्ये ती बंद करण्यात आली.
द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, महिला अभियंता इस्थर अन्हुया हिच्या हत्येनंतर 8 मार्च 2014 रोजी मुंबई पोलिसांतर्फे रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी 9969777888 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी माहिती दिली होती की, या क्रमाकांवर टॅक्सीचा वाहनक्रमांक एसएमएस केल्यानंतर जीपीएसद्वारे (GPS) टॅक्सीच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येईल. एमटीएनएलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही सेवा निःशुल्क होती.
मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस । टाईम्स ऑफ इंडिया
मात्र, या हेल्पलाईन क्रमांकास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मिड डेच्या 2 मार्च 2017 रोजीच्या बातमीनुसार, 2014 मध्ये हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर पहिल्या नऊ महिन्यांत केवळ 1266 मेसेज या हेल्पलाईनवर प्राप्त झाले. नंतर नंतर हा प्रतिसाद आणखी रोडावत गेला. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळू लागला. या कारणाने 2017 साली मुंबई पोलिसांनी 9969777888 ही हेल्पलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला.
मूळ बातमी येथे वाचवा – मिड डे । अर्काइव्ह
विशेष म्हणजे ही सेवा बंद झाल्यानंतर देशातील विविध राज्यांतील पोलिसांच्या नावे हा क्रमांक महिला सुरक्षेची हेल्पलाईन म्हणून पसरविण्यात येऊ लागला. त्याचा प्रचार व प्रसार इतका वाढला की, दिल्ली पोलिस आणि बंगळुरू पोलिसांनी 9969777888 हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे ट्विटरवरून खुलासा केला होता. टाईम्स ऑफ इंडियानेसुद्धा या संदर्भात बातमीदेऊन या हेल्पलाईन क्रमाकांबद्दली अफवा असल्याचे म्हटले आहे.
अर्काइव्ह
यापूर्वी हा मेसेज एसएम हॉक्सस्लेयर, ऑल्ट न्यूज, न्यूजमोबाईल, बुमलाईव्ह यांनी फॅक्ट चेक केलेला आहे.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची हेल्पालाईन म्हणून फिरवला जाणारा 9969777888 हा नंबर 2017 पासून बंद आहे. त्यामुळे वाचकांनी अशा भ्रामक व चुकीची माहिती देणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि तो पसरवू नये.

Title:महिला सुरक्षेची 9969777888 ही हेल्पलाईन 2017 सालीच बंद झाली आहे. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
