आई आणि मुलांच्या आत्महत्येचा तो व्हायरल व्हिडियो सोलापुरमधील नाही. वाचा सत्य

Coronavirus False

आईसह तिच्या दोन्हा लहान मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा करण्यात येत आहे की, मन सुन्न करणारी ही घटना सोलापूर शहरातील घडली आहे. लॉकडाऊनदरम्यान घरातील रेशन संपल्यामुळे या आईने मुलांसह आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता दावा खोटा असल्याचे आढळले.

काय आहे पोस्टमध्ये?

15 सेंकदाच्या क्लिपमध्ये आई आणि दोन लहान मुलांना गळफास लावल्याचे दिसते. सोबत म्हटले की, ”सोलापूर येथील विसापूर नाका कृष्णा डेरी मागील दुर्घटना. घरात रेशन नसल्यामुळे  आईने दोन्ही मुलांच्या सोबत गळफास लावून केली आत्महत्या .”

2020-05-08.jpg

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील घटनेचे गांभीर्य आणि भीषणता पाहता याविषयी नक्कीच बातम्या झाल्या असतील. परंतु, सोलापूरमध्ये अशी काही घटना घडल्याची एकही बातमी आढळली नाही. 

सोलापूरमधील वृत्तपत्रांची तपासणी केल्यावरही तशी बातमी प्रसिद्ध झाल्याचे सापडले नाही. मग हा व्हिडियो सोलापूरमधील खरंच आहे का?

सोलापूरमधील ज्या विजापूर भागात ही घटना घडल्याचे म्हटले आहे, त्या विजापूर नाका पोलिस ठाण्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क केला. त्यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही. तो व्हायरल व्हिडियो सोलापूरमधील नाही.

विजापूर नाका ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्हिडियो मेसेजद्वारेदेखील या व्हिडियोबाबात खुलासा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोला पाठवलेला तो व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये ते म्हणतात की, “सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो आई व दोन मुलांच्या आत्महत्येचा व्हिडियो सोलापूरमधील नाही. अशी कोणतीही घटना येथे घडलेली नाही. कोणी तरी खोडसाळपणे हा व्हिडियो खोट्या माहितीसह व्हायरल केला आहे. त्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”

मग हा व्हिडियो कुठला आहे?

व्हिडियोतील की-फ्रेम्सची निवड करून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, सदरील व्हिडियो भारतातील विविध शहरांच्या नावे व्हायरल झालेला आहे. हा व्हिडियो अहमदाबादमधील असल्याचे पसरल्यानंतर तेथील पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला होता. 

अधिक शोध घेतल्यावर हा व्हिडियो 5 एप्रिल रोजी बांग्लादेशमधील विविध फेसबुक पेजवर तो शेयर करण्यात आल्याचे आढळले. पोस्टखालील कमेंटमध्ये हा व्हिडियो ढाका शहरातील असल्याचे म्हटले आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोतर्फे या माहितीची स्वतंत्र पुष्टी होऊ शकली नाही.

निष्कर्ष

सोलापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आई व मुलांच्या आत्महत्येचा हा व्हायरल व्हिडियो सोलापूरमधील नाही. अशी कोणतीही घटना तेथे घडलेली नाही. तसेच हा व्हिडियो एका महिन्यापूर्वी बांग्लादेशमधील फेसबुक पेजेसवर देखील शेयर करण्यात येत होता. याचा अर्थ की, हा व्हिडियो जुना आहे. परंतु, तो नेमका कुठला आहे, याविषयी ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:आई आणि मुलांच्या आत्महत्येचा तो व्हायरल व्हिडियो सोलापुरमधील नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False