भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी हल्ला करीत चोप दिला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ शेयर होत आहे. कृषीविषयक नवीन विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांचा हा रोष असल्याचे म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ 2016 साली पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीचा आहे.

काय आहे दावा?

सुमारे दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये संतप्त जमाव एका पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीला बेदम मारत असल्याचे दिसते. पोलिस त्या व्यक्तीला जमावापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात; परंतु लोक त्याला चापट-बुक्क्या मारत राहतात. अखेर पोलीस त्याला गाडीमध्ये बसवून सुरक्षित जागी घेऊन जातात.

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पहा आता जनता जागी झाली आहे. दिल्लीत संतप्त शेतकर्यांकडून बिजेपी सांसद हर्षवर्धन यांची धुलाईने केली सुरुवात. अन्याया विरोधात जर आवाज उठवला नाही तर आता नेत्यांची काही खैर नाही.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केला का याची माहिती घेतली. अशा आशयाची एकही बातमी आढळली नाही. केंद्रीय मंत्र्याला मारहाण झाली तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये तशी बातमी नाही.

मग व्हिडिओतील कीफ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर सदरील व्हिडिओतील दृश्ये आढळली. 2016 मधील या ट्विटमध्ये म्हटले की, पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे तत्कालिन केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या रॅलीदरम्यान गोंधळ उडाला होता.

https://twitter.com/ANI/status/788718439732961280?ref_src=twsrc%5Etfw

अर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता ‘एएनआय’च्या युट्यूब चॅनेलवर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आढळला. त्यात म्हटले की, आसनसोल येथे 19 ऑक्टोबर 2016 रोजी बाबुल सुप्रियो यांच्या रॅलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी हाणामारी झाली. दरम्यान, भाजपच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करीत कपडे फाडण्यात आले.

https://www.youtube.com/watch?v=EQCYR1Dr5jM

मग ज्याला मारहाण झाली तो कार्यकर्ता कोण आहे?

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, या हल्ल्यामध्ये भाजपचा स्थानिक नेता सुभ्रत मिश्रा यांना मारहाण झाली होती.

फॅक्ट क्रेसेंडोने मग सुभ्रत मिश्रा यांना फोन लावला. त्यांनी सांगितले की, “सदरील व्हायरल व्हिडिओत दिसणारा व्यक्ती मीच आहे. 2016 साली आसनसोल येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता.”

या गोंधळामध्ये बाबुल सुप्रीयो यांच्या छातीवरदेखील मार लागला होता. त्यांनी ट्विट करून छातीवरील मारहाणीचे फोटो शेयर केले होते.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीदेखील हा व्हिडिओ डॉ. हर्षवर्धन यांना मारहाण झाल्याची म्हणून व्हायरल झाला होता. तेव्हाच खासदार डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून खुलासा केला होता की, “सदरील व्हिडिओ त्यांचा नाही. माझ्या नावाने चुकीचा व्हिडिओ शेयर करून बदनामी केली जात आहे.”

https://twitter.com/drharshvardhan/status/802734529509064704?ref_src=twsrc%5Etfw

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, चार वर्षांपूर्वीचा जुना आणि असंबंधित व्हिडिओ शेयर करून डॉ. हर्षवर्धन यांच्या नावे चुकीची माहिती पसरविली जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. हर्षवर्धन नसून, भाजप कार्यकर्ता सुभ्रत मिश्रा आहे. 2016 साली आसनसोल येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे सदरील व्हिडिओसोबत केला जाणारा दावा असत्य आहे.

Avatar

Title:भाजपचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांना जनतेने चोप दिल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False