
‘द सिम्पसन्स’ ही जगातली सर्वोत्तम टीव्ही मालिकांपैकी एक मानली जाते. गेल्या तीन दशकांपासून ही कार्टून सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ही मालिका आणखी एका वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. ते म्हणजे भविष्य वर्तविण्यासाठी. नाही कळालं?
‘द सिम्पसन्स’ मालिकेत दाखविलेल्या गोष्टी पुढे अनेक वर्षांनंतर खऱ्या ठरतात, असा एक समज आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील हे ‘द सिम्पसन्स’ मालिकेत 2000 सालीच म्हटले होते. त्यामुळे या मालिकेतील गोष्टींकडे लोकांचे लक्ष लागून असते.
ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी झळल्यानंतर इंटरनेटवर दावा केला जात आहे की, ‘सिम्पसन्स’ मालिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूचे भाकित वर्तविण्यात आले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.
काय आहे दावा?
‘द सिम्पसन्स’ मालिकेतील ट्रम्प यांचे पात्र शवपेटीमध्ये असल्याचा फोटो शेयर करून पोस्टमध्ये म्हटले की, “The Simpsons हे कार्टून भविष्यातील घडणाऱ्या घटनांची सूचना देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्यांनी ट्रम्प तात्या कॉफीन मध्ये झोपलेले आहे अस दर्शवल आहे. ते चित्र खाली दिलेले आहे. हे चित्र जर खरे असेल ट्रम्प तात्यानी काळजी घ्यायला हवी. ट्रम्प तात्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झालेला आहे. त्यांनी डॉक्टरांपासून दूर राहायला हवे.”
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली की, त्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा पासून ‘द सिम्पसन्स’ मालिकेतेतील हा कथित फोटो व्हायरल होत आहे.
सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ‘द इंडिपेडंट’ची एक बातमी आढळली. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा शवपेटीतील फोटो ‘डॉक्टर्ड’ म्हणजे छेडछाड केलेली आहे. तो सिम्पसन्स मालिकेतील अधिकृत फोटो नाही.
मूळ बातमी येथे वाचा – द इंडिपेडंट
फॅक्ट क्रेसेंडोप्रमाणे आयएफसीएन प्रमाणित असेलेल्या फॅक्ट चेकिंग वेबसाईट्सने हा फोटो सिम्पसन्स मालिकेतील नसल्याचे स्पष्ट करीत हा दावा खोटा असल्याचे सांगितले.
‘चेक युवर फॅक्ट’च्या पडताळणीनुसार, सिम्पसन्सच्या एकूण 32 सिझनच्या 686 एपिसोड्समध्ये कुठेही ट्रम्प यांच्या मृत्यूविषयी भाकित किंवा सध्या व्हायरल होत असलेला फोटो दाखविलेले नाही.
ट्रम्प यांचा शवपेटीतील फोटो सिम्पसनच्या मालिकेत कधीही झळकला नव्हता.
मग हा फोटो आला कुठून?
सर्वप्रथम हा फोटो 2017 साली इंटरनेटवर पसरण्यास सुरुवात झाली होती. ‘स्नोप्स’नुसार, Badabun या स्पॅनिश भाषेतील युट्यूब चॅनेलवर हा फोटो दाखविण्यात आला होता. त्यानंतर तो प्रचंड प्रमाणात शेयर होऊ लागला.
अधिक शोध घेतल्यावर कळाले की, 4chan.org नावाच्या वेबसाईटवर हा फोटो सर्वप्रथम अपलोड करण्यात आला होता. चाहत्याने तो तयार करून पसरविला होता. 4chan.org ही वेबसाईट अशाच निराधार कन्स्पिरसी थेयरीजसाठी प्रसिद्ध आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे पात्र असलेल्या सिम्पसन्याच क्लिप्स पाहायच्या असतील त्या येथे पाहू शकता. उदाहरण म्हणून खाली एक दिली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला दावे करण्यात आले होते की, सिम्पसन्सने कोरोना व्हायरसचे भाकित केले होते. पॉलिटीफॅक्टच्या पडताळणीत मात्र हा दावा असत्या आढळला होता. त्यावेळी सिम्पसन्सचे पूर्वलेखक बिल ओकले यांनी हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मालिकेच्या भविष्य वर्तविण्याच्या वैशिष्ट्याला नको तितके महत्त्व दिले जाते. मालिकेतील जुन्या क्लिप्सचा असा चुकीचा माहितीसाठी वापर करणे योग्य नाही.
मूळ मुलाखत येथे वाचा – हॉलिवूड रिपोर्टर
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, ट्रम्प यांचे शवपेटीतील चित्र सिम्पसन्स मालिकेतील नाही. कोणी तरी खोडसाळपद्धतीने तसा फोटो तयार करून इंटरनेटवर पसरविला आहे. ट्रम्प यांच्या मृत्यूचे भाकित सिम्पसन्स मालिकेत करण्यात आलेले नाही.

Title:‘सिम्पसन्स’ मालिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूचे भाकित वर्तविले होते का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
