
कोविड-19 या महारोगाची भीती जशीजशी वाढत आहे तसा लोकांचा संयम सुटत आहे. सोशल मीडियावर जो तो या रोगावर उपचार शेयर करीत आहे. आता तर काय म्हणे बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयाच्या पाठ्यपुस्तकात कोरोना विषाणूची माहिती व त्यावरील औषध दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक युजर्सने हा मेसेज पाठवून त्याचे फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणी अंती हा मेसेज खोटा असल्याचे निदर्शनास आले.
काय आहे मेसेजमध्ये?
पाठ्यपुस्तकातील एका पानाचा फोटो शेयर करून म्हटले की, बारावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकात कोरोना विषाणूची माहिती आधीच दिली आहे आणि त्यावरील उपयासुद्धा. पानावर लिहिले की, आपल्याला जो सर्दी-खोकला येतो तो राईन्हो व्हायरस (Rhinovirus) आणि कोरोना व्हायरस (Coronavirus) यांच्यामुळे होतो. राईन्हो व्हायरसमुळे सर्दी-खोकला होण्याचे प्रमाण 75 टक्के आहे. वातावरण बदलल्यामुळे तसेच हिवाळ्यात हा त्रास जाणवतो. त्यावर एस्पिरीन, अँटी-हिस्टेमिन, नाकात टाकण्याचा स्प्रे आदी औषधी लाभदायक आहेत.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक
तथ्य पडताळणी
या पुस्तकात ज्या कोरोना व्हायरसचा उल्लेख आहे तो विषाणू सध्या थैमान घातलेल्या कोविड-19 रोगाचा विषाणू नाही. तो वेगळा आहे. ते कसं हे समजून घेऊया:
कोरोना व्हायरस काय आहे ?
कोरना व्हायरस हे एका विषाणू गटाचे (फॅमिली ऑफ व्हायरस) नाव आहे. गटात अनेक विषाणू आहेत. या विषाणूच्या गोलाकार पृष्ठावर प्रोटिन स्पाईक्स (काटे) उगवलेले असतात. त्यामुळे तो मुकूटासारखा दिसतो. लॅटिनभाषेत मुकूटाला CORONA असे म्हणतात. त्यावरून या विषाणूगटाला कोरोना व्हायरस असे नाव पडले.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – WHO
कोरोनाव्हायरस फॅमिलीचे सदस्य
या विषाणूगटात अनेक प्रकारचे व्हायरस असले तरी मानवी आरोग्याला बाधा पोहचविणारे केवळ सात प्रकार वैज्ञानिकांना आढळले आहेत. ते असेः
- 229E (alpha coronavirus)
- NL63 (alpha coronavirus)
- OC43 (beta coronavirus)
- HKU1 (beta coronavirus)
- MERS-CoV
- SARS-CoV
- SARS-CoV-2 (Novel Coronavirus)
यापैकी MERS-Cov पासून मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम होतो. उंटापासून पसरणाऱ्या या रोगाची 2012 साली साथ आली होती. SARS-CoV पासून सिव्हियर अक्युट रेस्पेरिटरी सिंड्रोम (सार्स) होतो. 2002-03 साली सार्सची साथ आली होती.
सध्या जो पसरत आहे तो कोरोनाव्हायरस कोणता?
वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना व्हायरस हा एकदम नवीन प्रकारचा विषाणू आहे. सुरूवातील त्याविषयी फारशी माहिती नसल्यामुळे त्याला नोव्हेल कोरोनाव्हायरस म्हणजे नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात आले.
हाच विषाणू सध्या सर्वत्र पसरत आहे. त्याचे शास्त्रीय नाव SARS-CoV-2 असे आहे. सार्सला कारणीभूत ठरलेल्या विषाणूची ही पुढची आवृत्ती आहे. या विषाणूमुळे जो रोग होतो त्याचे नाव Covid-19 आहे.
मग बारावीच्या पुस्ताकातील कोरोनाव्हायरस कोणता आहे?
आपल्याला प्रामुख्याने तीन प्रकारच्या विषाणूंमुळे सर्दी-खोकला येतो.
- Rhinovirus
- Coronavirus (OC43 and 229E)
- RSV and parainfluenza
जसे की आपण पाहिले सध्या जो पसरतोय तो SARS-CoV-2 कोरोनाव्हायरस आहे. बारावीच्या पुस्तकात सर्दी-खोकल्यासाठी जबाबदार असलेला कोरोनाव्हायरस OC43 आणि 229E प्रकारचे आहेत. मानवी आरोग्यास बाधा पोहचविणारा कोरोनाव्हायरस सर्वप्रथम 1960 साली आढळला होता. हिवाळ्यात आणि पावसाळ सुरू झाल्यावर आपल्याला सर्दी-पडसं होते ते रायन्हो व्हायरस आणि OC43 आणि 229E कोरोनाव्हायरसमुळे होते.
त्यामुळे पुस्तकात जी माहिती दिली तो वेगळा कोरोनाव्हायरस आहे.

मूळ माहिती येथे वाचा – Medical News Today
पुस्तकात दिलेल्या गोळ्या घ्याव्यात का?
तो व्हायरसच वेगळा असल्यामुळे त्यावरील औषधी सध्याच्या कोविड-19 रोगावर कशा घेणार? जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, अद्याप कोविड-19 वर औषध किंवा लस विकसित झालेली नाही. त्याविषयी वेगाने संशोधन सुरू असून, लवकरच ती तयार होण्याची शक्यता आहे. परंतु, त्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधगोळ्या घेऊ नये. वारंवार हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाण न जाणे एवढी खबरदारी घ्यावी.
फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (निवृत्त) वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट करीत अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. “कोरोना विषाणूविषयी कोणतीही माहिती खात्री न करता शेयर करू नये. कोरोनासंबंधी माहिती देण्याचे काम तज्ज्ञांचे असून, सामान्य लोकांनी केवळ त्यावरच विश्वास ठेवावा,” असे ते म्हणाले.
डॉ. काळे यांनी सुमारे चार दशके सूक्ष्मजीवशास्त्र याविषयात संशोधन केलेले आहे.
त्यांनी पाठवलेल्या लिखित संदेशात म्हटले की, “बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात सर्दी पडशा संबंधी जी माहिती दिली आहे ती फक्त इन्फ्लुएन्झा या नावाने जो रोग आपल्याला माहिती आहे त्या संदर्भातील आहे. तो रोग ज्या विषाणूंमुळे होतो ते करोना गटाचे असू शकतात. करोना हा विषाणूंचा मोठा गट असून त्याच्या विविध प्रजाती म्हणता येतील असे उपवर्ग असतात. उत्परिवर्तनामुळे (mutation) यात सतत बदल होत नवनवीन उपवर्ग तयार होत राहातात. हे उत्परिवर्तन कसे होते याची अनेक कारणे असू शकतात. सध्या ज्या विषाणू मुळे जग हवालदिल झाले आहे तो या करोना गटाचा नवीन उत्परिवर्तित असा उपवर्ग असून चीनमधील वूहान शहरात त्याचा प्रादुर्भाव प्रथम डिसेम्बर २९१९ मध्ये आढळला आणि त्याचे नामाभिधान कोव्हिड १९ असे केले गेले. म्हणजेच बारावीच्या पुस्तकातील उल्लेख केलेल्या विषाणू हून हा सर्वस्वी भिन्न असा विषाणू आहे याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
बारावीच्या पुस्तकात जी उपचार प्रणाली सुचविलेली आहे (ऍस्पिरिन.. वगैरे) तिचा आजच्या विषाणू मुळे होणाऱ्या आजाराशी संबंध नाही आणि तसा तो कुणी जोडू नये अशी सर्वांना विनंती आहे.
आजच्या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारावर उपाययोजना करण्याचे काम डॉक्टरांचे आहे, आपले नाही हे ध्यानात ठेवा.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, कोरोनाव्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. बारावीच्या पुस्तकात कोविड-19 रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाव्हायरसची (SARS-CoV-2) माहिती दिलेली नाही. पुस्तकात दिलेली माहिती सर्दी-खोकला या आजाराला कारणीभूत OC43 and 229E प्रकारच्या कोरोनाव्हायरसची आहे. त्यामुळे या मेसेजवरू विश्वास ठेवून त्यात दिलेल्या औषधगोळ्या घेऊ नयेत.

Title:बारावीच्या पुस्तकात कोरोना व्हायरसची माहिती आणि उपचार नाही. तो मेसेज चुकीचा आहे. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
