रुग्णालयात तडफडणारा तो रुग्ण कोरोनाबाधित नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

Coronavirus False Medical

कोरोनाच्या धास्तीने लोक वाटेल ते व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करीत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रुग्णालयात तडफडणारा एक रुग्ण दिसतो. हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही लोकांनी हा व्हिडियो भारतातील असल्याचे म्हटले तर, कोणी इटलीचा आहे म्हणून पसरवित आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअपवर हा व्हिडियो पाठवून याचे सत्य सांगण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

व्हिडियोमध्ये गुलाबी पँट व पांढरा टी शर्ट घातलेला तोंडाला मास्क लावलेला एक तरुण वेदनेने तडफडत असल्याचे दिसते. त्याच्या तीन छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर असे हाल होत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात येत आहे.

Corona-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

या व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी इन-व्हिड टूलच्या माध्यमातून की-फ्रेम्स मिळवून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो भारतातील नाही. हा व्हिडियो स्पेनमधील आहे. तेथील मॅड्रिड शहरातील हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण दाखल झाला होता. त्याला श्वसनास त्रास होत होता. हा कोरोनाचा संशियत रुग्ण असल्याचे तेव्हा शंका उपस्थित करण्यात आली होती.

परंतु, एका स्पॅनिश वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या संपूर्ण चाचण्या करण्यात आल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तेथील डॉक्टरांनी माहिती दिली की, या रुग्णाला अक्युट रेस्पिरेटोरी इन्फेक्शन अर्थातच श्वसनांसंबंधी संसर्ग झाला होता. त्याचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. 

spain-1.png

मूळ बातमी येथे वाचा – Hoy Diario Del Magdalena

हाच व्हिडियो अहमदाबादमधील म्हणूनदेखील व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडो गुजरातीने यासंबंधी फॅक्ट केले आहे. तसेच हा व्हिडियो मंगलोर शहातील म्हणून देखील व्हायरल झाला होता. तेथील वैद्यकीय अधीक्षकांनीसुद्धा हा व्हिडियोसंबंधीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, सदरील व्हायरल व्हिडियोतील रुग्णाला कोरोनाची लागण झालेली नव्हती. त्याला श्वसनासंबंधी संसर्ग झाला होता. त्याला कोरोनाचा रुग्ण म्हणने चूक आहे. या व्हिडियोची भीती दाखवून लोक घरामध्येच राहण्याचे आवाहन करीत आहेत. हा व्हिडियो शेयर करण्यामागे लोकांची भावना जरी काळजीची असली तरी, लोकांमध्ये कोविड-19 महारोगाविषयी विनाकारण गैरसमज पसरत आहे. तसे न करणे समाजहिताचे ठरेल.

Avatar

Title:रुग्णालयात तडफडणारा तो रुग्ण कोरोनाबाधित नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False