ट्रकद्वारे विमानाचे लँडिंग करून 350 प्रवाशांचे जीव वाचवणारा हा व्हिडियो खरा नाही. ती जाहिरात आहे. वाचा सत्य

False राजकीय | Political

विमानात बिघाड झाल्यामुळे ते सुरक्षित उतरविणे अशक्य होते…विमानात 350 प्रवाशांचा जीव धोक्यात…वैमानिकाला सुचेना काय करावे…विमानतळावर तणावपूर्ण वातावरण…आणि सगळं काही संपले असे वाटत असतानाच एक साहसी ट्रकचालक वेगाने धावपट्टीवर येतो…विमानाचे पुढचे चाक तुटल्यामुळे लँडिंग होताच अपघात होणार हे स्पष्ट…पण ट्रकचालक मोठ्या हिंमतीने त्याची गाडी विमानासमोर नेतो आणि विमानाचे पुढील चाल ट्रकवर टेकवतो…आणि विमानाची सुरक्षित लँडिंग होते.

काळजाचा ठेका चुकवणारा व्हिडियो सोशल मीडियावर बराच गाजत आहे. ट्रकचालकाचे साहस आणि चतुरतेमुळे 350 जणांचा प्राण वाचला असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. ट्रक चालकाचे नाव जेसन लोसी सांगितले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. तपासाअंती कळाले की, हे सगळं खोटं आहे.

तथ्य पडताळणी

सदरी व्हिडियोची सत्यता जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे निरीक्षण केले. त्यातून कळाले की हा व्हिडियो टिक-टॉक नावाच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. Ash Alom (@ashalomlite) नामक युजरने तो शेयर केलेला आहे.

मूळ व्हिडियो येथे वाचा – टिक-टॉक

की-फ्रेम्सद्वारे गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता युट्यूबवरील 2011 साली अपलोड करण्यात आलेला एक व्हिडियो आढळला. यानुसार, हा व्हिडियो निसान कंपनीच्या फ्रंटियर पिक-अप ट्रकची जाहिरात आहे. व्हिडियोमध्ये “Fictionalization. Do not attempt” असेदेखील लिहिलेले आहे.

आणखी एका युजरने हा व्हिडियो अपलोड करून सांगितले होते की, विमानाला सुरक्षित उतरविणाऱ्या या ट्रकचा हा व्हिडियो खरा नाही. 2011 साली तयार करण्यात आलेली ही निसान फ्रंटियरची जाहिरात आहे. अनेक लोकांनी हा व्हिडियो खरा मानून शेयर केला आहे. परंतु, ही केवळ जाहिरात होती. असे वास्तवात घडलेले नाही.

व्हिडियो येथे पाहा – यूट्यूब

Jalopnik नावाच्या वेबसाईटने 2012 साली सिद्ध केले होते की, ट्रकच्या मदतीने विमानाची लँडिंग करणे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे. TBWA Worldwide नावाच्या जाहिरात कंपनीने निसान कंपनीच्या फ्रंटेयिर ट्रकची ही जाहिरात तयार केली होती. त्यानंतर कंपनीने स्पष्टीकरणदेखील दिले होते की, लोकांना फसवण्याचा आमचा उद्देश नव्हता. ही केवळ एक जाहिरात आहे. 

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, ट्रकवर विमान उतरण्याचा हा व्हिडियो खरा नाही. ही निसान कंपनीच्या ट्रकची जाहिरात आहे. या विमानामध्ये बिघाड झाला नव्हता आणि 350 प्रवाशांचा जीवसुद्धा धोक्यात नव्हता. स्नोप्स वेबसाईटनचे 2014 साली याचे फॅक्ट चेक केले होते.

Avatar

Title:ट्रकद्वारे विमानाचे लँडिंग करून 350 प्रवाशांचे जीव वाचवणारा हा व्हिडियो खरा नाही. ती जाहिरात आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False