
अजिंठासारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून हाल आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचलेला आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी तर या रस्त्यावर सामान्यबाब झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत ओरड सुरू झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला.
या पार्श्वभूमीवर चिखलात रुतलेल्या बसचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पण गंमत अशी की, विविध मराठी दैनिकांनी हा एकच फोटो वेगवेगळ्या ठिकाणांचा म्हणून प्रसिद्ध केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातम्यांचे कात्रण व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून हा फोटो नेमका कुठला आहे हे तापसण्याची विनंती केली.

महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीने 3 नोव्हेंबर रोजी हा फोटो औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील मंगरूळ-आन्वी फाट्यावरील (ता. सिल्लोड) असल्याचा म्हणून छापला. त्याच दिवशी लोकमतची सोलापूर आवृत्ती आणि पुढारी पेपरने हा फोटो निमगाव (ता. करमाळा) गावातील म्हणून प्रसिद्ध केला. देशोन्नती आणि सकाळने हा फोटो परभणी-जिंतूर रोडवरील असल्याचे म्हटले. फेसबुकवरसुद्धा हा फोटो फिरत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, या फोटोच्या स्थानाबद्दल साशंकता आहे. मग हा फोटो औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर यापैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे?

तथ्य पडताळणी
फोटोचे नेमके स्थान निश्चत करण्यासाठी या घटनेचे विविध अंगांनी काढलेले फोटो/व्हिडियो, बसचा क्रमांक आणि त्या बसमधील चालक-वाहकांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया मिळवणे आवश्यक आहे.
त्यानुसार फॅक्ट क्रेसेंडोने तिन्ही जिल्हातील स्थानिक पत्रकार, संबंधित गावातील लोक आणि बस स्थानकांशी संपर्क केला. औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक व पत्रकारांनी एकतर संबंधित फोटो त्यांच्याकडील नसल्याचे सांगितले किंवा या घटनेचे इतर फोटो देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र, परभणी जिल्ह्यातील पत्रकारांनी संबंधित बसचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडियो आम्हाला पाठवले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

सदरील फोटोंची क्वालिटी अत्यंत चांगली असून, यामध्ये बसचा क्रमांक MH 20 BL 1318 स्पष्ट दिसतो. तसेच ही बस परभणी डेपो असल्याचेही कळते. त्यानुसार मग फॅक्ट क्रेसेंडोने परभणी बसस्थानकाशी संपर्क साधला. तेथील सहायक वाहतूक अधीक्षक (स्थानकप्रमुख) वर्षा येरेकर यांनी हे फोटो परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.
त्यांनी माहिती दिली की, ‘परभणी-जिंतूर मार्गाचे काम सुरू असून पावसाने चिखल तयार झाला आहे. सदरील बस 1 नोव्हेंबर रोजी उकळी येथून परभणीकडे येत होती. सकाळी सुमारे साडेअकरा वाजता जलालपूर पाटीजवळ बस चिखलात रुतली. त्यामुळे प्रवाशी बसमधून बाहेर पडले. ट्रॅक्टरच्या मदतीने बसला बाहेर काढण्यात आले. हा फोटो औरंगाबाद-जळगाव रोड किंवा सोलापूर जिल्ह्यातील नाही.’
यावेळी एम. एस. जगताप बसचे चालक होते तर, एस. आर. राठोड हे वाहक होते. श्री. राठोड यांनी सांगितले की, ‘परभणी-जिंतूर मार्गावरील जलालपूर पाटीपासून साधारण दीड-दोन किमी अंतरावर आमची बस चिखलात फसली होती. तेव्हा आसपास जमलेल्या लोकांनी हे फोटो काढले.’
या घटनेचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, चिखलात रुतलेल्या या बसचा फोटो परभणी जिल्ह्यातील आहे. हा फोटो औरंगाबाद-जळगाव रोड किंवा सोलापूर जिल्ह्यातील नाही. आपल्याकडेसुद्धा असे काही शंकास्पद फोटो, व्हिडियो, मेसेज, बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोकडे व्हॉट्सअॅपद्वारे (9049043487) पाठवा.

Title:परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो दैनिकांनी औरंगाबाद-जळगाव रोडचा म्हणून छापला. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
