नांदेडमध्ये दहशतवादी पकडले का? रेल्वे स्टेशनवरील मॉक ड्रिलचा व्हिडिओ व्हायरल

False Social

दहशतवाद्यांकडून गेल्या वर्षी नांदेडला येणारा मोठा शस्त्रास्त्रसाठी हरियाणा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा शहरात दहशतवादी पकडल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. रेल्वेस्थानकावरून काही लोकांना अटक करून घेऊन जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नांदेड येथून पोलिसांनी दहशतवद्यांना ताब्यात घेतले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा असून हा व्हिडिओ नांदेड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आयोजित केलेल्या मॉक ड्रिलचा आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकावर तीन जणांना पोलिसांनी पकडल्याचे दिसते. सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “नांदेड शहरातील धक्कादायक घटना. दिनांक 12/01/2023 नांदेड येथील रेलवे स्टेशन परिसरात बॉम्ब स्फोट लावणाऱ्या आरोपींना अटक केली.”

मूळ पोसेट – इन्स्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, एमसीएन नांदेड नामक युट्युब चॅनलवर या घटनेची संपूर्ण व्हिडिओसह बातमी आढळली. त्यानुसार, 12 जानेवारी रोजी नांदेड रेल्वेस्थानकावर स्पेशल टास्क फोर्सद्वारे मॉक ड्रिल घेण्यात आली होती. स्थानकावर दहशतवादी हल्ला झाल्यावर कशी कारवाई करावी याचा यामध्ये सराव करण्यात आला आहे. 

यासंदर्भात लोकमतने बातमीसुद्धा प्रकाशित केलेली आहे. यानुसार, फलाट क्रमांक एकवर दहशतवादी लपल्याचा बनाव करून हा अभ्यास सराव करण्यात आला होता. यामध्ये बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकानेसुद्धा सहभाग घेतला होता. सकाळी 11 वाजता ही मॉक ड्रिल घेण्यात आली होती. 

फॅक्ट क्रेसेंडोने नांदेड रेल्वे पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन करत सांगितले की, व्हायरल व्हिडिओ हा खऱ्याखुऱ्या दहशदवादी हल्ल्याचा नाही. ही केवळ मॉक ड्रिल होती. भविष्यात अशी घटना घडल्यास सुरक्षारक्षकांनी कशी कारवाई केली पाहिजे आणि अशा परिस्थितीत कसे निर्णय घेतले पाहिजे याचा सराव म्हणून हा सराव करण्यात आला होता.

दरम्यान, स्टेशनवरील प्रवाशांना सूचित करण्यासाठी या मॉक ड्रिलविषयी घोषणादेखील करण्यात आली होती. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नांदेड रेलवे स्टेशनमध्ये बॉम्ब लावणाऱ्या दहशतवाद्यांना अटक केलेली नाही. हा व्हिडिओ मॉक ड्रिलचा आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नांदेडमध्ये दहशतवादी पकडले का? रेल्वे स्टेशनवरील मॉक ड्रिलचा व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False