
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत केलेले भाषण म्हणजे जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख देणारे ठरले. “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो” अशी त्यांची सुरुवातच तेथे उपस्थित श्रोत्यांना मोहित करणारी होती. आपल्या भाषणातून त्यांनी सहिष्णुता, बंधुता, व सर्वसमावेशकतेचा संदेश; तर सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेचा विरोध केला. 11 सप्टेंबर 1893 रोजी केलेले हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या भाषणाबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक आहे.
सोशल मीडियावर विवेकानंदांच्या या भाषणाचा खरा आणि अत्यंत दुर्मिळ व्हिडियो म्हणून एक व्हिडियो क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने शेयर केली जात आहे. अडीच मिनिटांच्या ही रंगीत व्हिडियो क्लिप शिकागो येथील भाषणाचा ‘खरा’ व्हिडियो असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । युट्यूब
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील खाली दिलेल्या मजकूरासह पसरत आहेत.
* Rare original Video…September 13, 1893…Chicago Universal Society…Swami Vivekananda speech Press.
* दुर्लभ ओरिजनल वीडियो…स्वामी विवेकानन्दने अमेरिका के शिकागो में 13 सितम्बर1893 को दिया व्याख्यान।
* 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेमध्ये भाषण करताना स्वामी विवेकानंद ! संग्रही ठेवावी अशी अत्यंत दुर्मिळ चित्रफीत.
फेसबुकवर हा व्हिडियो प्रचंड व्हायरल आहे.

तथ्य पडताळणी
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर पुढील बाबी समोर येतात ज्यामुळे या दाव्याची सत्यता शंकास्पद ठरते:
1. व्हिडियो रंगीत आहे.
2. व्हिडियो एका हून अधिक कॅमेऱ्याने चित्रित केलेला आहे
3. व्हिडियोचे विविध अँगलद्वारे एडिट केलेला आहे
दावा केल्याप्रमाणे जर हा खरंच 1893 मधील खरा व्हिडियो असेल तर त्याकाळी मल्टीकॅम आणि तेदेखील रंगीत चित्रिकरण म्हणजे आश्चर्यच मानावे लागेल. कारण जगातील पहिला व्हिडियो 1888 साली तयार करण्यात आल्याचे मानले जाते तर, जगातील पहिला रंगीत व्हिडियो एडवर्ड टर्नर यांनी 1901 साली तयार केली होती.
त्यामुळे स्वामी विवेकानंदांचा 1893 साली इतका चांगला व्हिडियो चित्रित होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मुळात जागतिक सर्वधर्म परिषदेतील त्यांचे भाषण एखाद्या फॉरमॅटमध्ये रेकॉर्ड करण्याता आले होते का याचा शोध घेतला. न्यूज 18 वेबसाईटवरील बातमीनुसार, विवेकानंद यांचा मूळ आवाज म्हणून जेव्हा एक क्लिप इंटरनेटवर पसरली तेव्हा वर्ल्ड बँकेत काम केलेल्या MS Nanjundiah यांनी श्री रामकृष्ण मठाच्या ‘दे वेदांत’ मॅगझिनमध्ये लेख लिहून स्पष्ट केले की, जागतिक सर्वधर्म परिषदेतील विवेकानंदांच्या भाषणाची कोणतीही रेकॉर्डिग उपलब्ध नाही.

मूळ बातमी आणि लेख येथे वाचा – न्यूज 18 । द वेदांत
विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठानेदेखील स्पष्ट केले आहे की, विवेकानंदांचा आवाज किंवा व्हिडियो रेकॉर्ड अस्तित्त्वात नाही. ‘द हिंदू’मधील बातमीनुसार, इंटरनेटवर विवेकानंदांचा आवाज किंवा व्हिडियो म्हणून उपलब्ध असलेल्या सर्व क्लिप खोट्या असल्याचे मठाने सांगितले आहे. विवेकानंदांसंबंधी संशोधन करण्यासाठी मेरी लुई बर्क यांनी 1994 साली बेलुर मठाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील भाषण रेकॉर्डच करण्यात आले नव्हते, असे सांगितले होते.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदू । अर्काइव्ह
मग ही व्हिडियो क्लिपचं काय?
चेन्नई येथील श्री रामकृष्ण मठाने 2011 साली Vivekananda by Vivekananda नावाचा एक चित्रपट तयार केला होता. विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सारागूर यांनी केले होते. मूळ इंग्रजीतील या फिल्ममध्ये बालाजी मनोहर यांनी विवेकानंदाची भूमिका साकारलेली आहे. ही फिल्म रामकृष्ण मठाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असून, मठाच्या युट्यूब चॅनेलवरदेखील अपलोड करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या व्हिडियोच्या 13.33 मिनिटांपासून विवेकानंदांचे भाषण पाहू शकता. ही क्लिप एडिट करून सोशल मीडियावर पसरविली जात आहे.
निष्कर्ष
स्वामी विवेकानंदांचे 1893 साली शिकागो येथील भाषणाचा अत्यंत दुर्मिळ आणि खरा व्हिडियो म्हणून पसरविला जाणार व्हिडियो Vivekananda by Vivekananda नावाच्या चित्रपटातील एक सीन आहे. तो विवेकानंदांचा खरा व्हिडियो नाही. स्वामी विवेकानंद यांच्या आवाजाची कोणतीही रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या शब्दांवर विश्वास ठेवा, पण व्हिडियोला नाट्यरुपांतर म्हणूनच पाहा.

Title:हा स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाचा ORIGINAL व्हिडियो नाही. तो चित्रपटातील सीन आहे.
Fact Check By: Agastya DeokarResult: False

फॅक्ट चेकर आपण खूप चांगलं काम करत आहात. लोकांना चुकीच्या बातम्यांची सत्यता सविस्तर सांगून.