
सोशल मीडियारील एका व्हायरल व्हिडियोनुसार, मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय सेवक संघाचा एक सदस्य बुरखा घालून फिरत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने सत्य पडताळणी केली आहे.
तौफिक सिद्दिकी नावाच्या युजरने 11 सप्टेंबर 2018 रोजी वरील पोस्टमध्ये दोन व्हिडियो आणि एक फोटो शेयर केला आहे. पडताळणी करेपर्यंत सदरील पोस्ट तब्बल 66 हजार वेळा शेयर करण्यात आली आहे.
तथ्य पडताळणी
तौफिक सिद्दिकी यूजरने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एक भगवाधारी संघी बुरखा पहन कर घूम रहा था, आस पास के लोगो ने धरदबोचा! लड़के का नाम सूरज परुलेखर है, जो की Goa का रहने वाला है!!!” (एक भगवाधारी संघी बुरखा घालून फिरत होता. आसपासच्या लोकांनी त्याला पकडले. त्याचे नाव सुरज परुलेखर आहे. जो गोव्याचा रहिवासी आहे.)
पहिल्या व्हिडियोमध्ये एका बुरखा घातलेल्या युवकाला लोकांनी पकडल्याचे दिसते. युवक त्यांना “मारू नका” अशी विनंती करतोय. “तू असा बुरखा घालून येथे का आला?” असे लोक त्याला विचारतात. तसेच त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी करतात.
दुसऱ्या व्हिडियोमध्ये बुरखाधारी युवक फोनवर बोलताना दिसतो. लोक त्याच्याकडून फोन हिसकावून घेतात. दोन्ही व्हिडियो मिळून 20 लाख व्ह्यूव मिळाले आहेत.
पोस्टमधील फोटोत बुरखा घातलेल्या तरुणाचे आधार कार्ड आहे. त्यात त्याचे नाव सुरज परुळेकर असे दिले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने मग गुगलवर – Suraj Parulekar Burkha मग असे सर्च केले. तेव्हा द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेली एक बातमी मिळाली. 10 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या बातमीत म्हटले आहे की, सुरज दिलीप परुळेकर (वय 32) हा तरुण गोवा येथील रुमडामोल-दावोरलिम गावातील साईनगर-टोलेबंद या मुस्लिम बहुल भागात बुरखा घालून संशयितरीत्या फिरताना आढळला. त्याला माईना-करटोरिम पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

बातमीत पुढे म्हटले आहे की, सुरज परुलेकर मानसिक उपचार घेत असून त्यासंबंधी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना कागदपत्र सादर केले. मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह
आम्ही दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) अरविंद गवस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अशी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
त्यानंतर आम्ही ही घटना जेथे घडली तेथील माईना-करटोरिम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार वस्त यांच्या थेट संपर्क केला.
वस्त यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, सुरज परुळेकर हा मानसिक उपचार घेत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार मग त्याला सोडण्यात आले. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की सुरजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कोणताही संबंध नाही.

तसेच सोशल मीडियवरील एका पोस्टमध्ये सुरजला गोव्यातील सनातन संस्थेशी निगडीत असल्याचा दावा करण्यात आला. ती पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
आम्ही सनातन संस्थेच्या गोवा मुख्यालयाशी संपर्क साधला. संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सुरज परुळेकर या तरुणाचा सनातन संस्थेशी काही संबंध नाही, असे सांगितले. तसेच संस्थेविषयी अपप्रचार करण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले.
निष्कर्ष
व्हिडियोत दाखविलेल्या घटनेचा तपास केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सदरील पोस्टमधील दावा स्पष्टपणे नाकारत या तरुणाचा संघाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच या व्हिडियोला जातीय रंग न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे

Title:तथ्य पडताळणीः गोव्यात बुरखा घालून फिरणाऱ्या तरुणाचा उद्देश काय?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
