
अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे वाकयुद्ध तापलेले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कंगनाला समर्थन देण्यासाठी करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा (FALSE) आढळला.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब ताफ्याचे फोटो शेयर करून कॅप्शन दिली आहे की, कंगना रणौतसाठी 1000 गाड्यांचा ताफा घेऊन करणी सेना महाराष्ट्राकडे रवाना.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
पोस्टमधील दोन्ही फोटोंना रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर काळाले हे दोन्ही फोटो जुने आहेत.
फोटो क्र. 1
पहिला फोटो करणी सेनेच्या फेसबुक पेजवरून 22 डिसेंबर 2019 रोजी शेयर करण्यात आला होता. त्यातील माहितीनुसार, हा फोटो गुजरातची राजधानी गांधीनगर येथील आहे. करणी सेनेचे गुजरात अध्यक्ष राज शेखावत आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्र सिंह यांच्या महारॅलीचा हा फोटो आहे.
म्हणजे हा फोटो यावर्षीचा नाही किंवा तो कंगणा प्रकरणाशीदेखील संबंधित नाही.

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
फोटो क्र. 2
स्कॉर्पियो गाड्यांचा हा फोटो 1 मार्च 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले. हा फोटोची अधिक माहिती अद्याप मिळाली नसली तरी तो किमान तीन वर्षे जुना असल्यामुळे त्याचा सध्या सुरू असलेल्या कंगना रणौत प्रकरणाशी काही संबंध नाही हे स्पष्ट होते.
फॅक्ट क्रेसेंडोने मग करणी सेनेचे मुंबईतील अध्यक्ष नरेंद्रसिंग राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियावर 1000 वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, “कंगनाला आमचे समर्थन जरूर आहे. परंतु, त्याकरिता 1000 गाड्या मुंबईला आलेल्या नाहीत. गुजरात आणि राजस्थानहून करणी सेनेचे कार्यकर्ते सुमारे 60 गाड्या घेऊन मुंबईला आलेले आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो जुने आणि त्यासोबत केले जाणारे दावे असत्य आहेत.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, जुने आणि असंबंधित फोटो शेयर करून करणी सेनेच्या 1000 गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्याचा खोटा दावा केला जात आहे. कंगना रणौतच्या समर्थनात एवढ्या गाड्या येत असल्याच्या पोस्ट चुकीच्या आहेत.

Title:कंगना रणौतच्या समर्थनात करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा रवाना झाला का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
