व्हायरल व्हिडिओमध्ये बनावट काजू बनवले जात नसून ते ‘काजू नमक पारे’ आहेत; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

भेसळयुक्त खाद्यपदार्थांची समस्या गंभीर असून सोशल मीडियावर याविषयी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, काजुचे तुकडे आणि भिजलेल्या शेंगदाण्याची पेस्ट वापरून कृत्रिम काजू बनवताना दाखविले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये कृत्रिम काजू बनवले जात नसून ते त्या आकारातील ‘काजू नमक पारे’ आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

एका मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झाकणाच्या सह्याने पांढऱ्या पिठापासून अर्धचंद्र आकाराचे तुकडे तयार करताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “सावधान, तुटलेले तुकडा काजू आणि साल काढलेले पांढरे मोठे शेंगदाणे भिजवून त्यांची पेस्ट वापरून कृत्रिम काजू कसा बनवला जातो ते बघा . जर सर्व काजूंचा आकार समान असेल तर ते बनावट असू शकतात ..असे काजू बार मधे मसाला काजू म्हणून दिले जातात. हेच पीठ साच्यात घालून त्यावर प्रोसेस करतात आणि तो बनावट काजू कोकणात ही काजूच्याच दरात विकला जातो. ह्यावर उपाय म्हणून साल वाला काजू घ्यायचा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह | इंस्टाग्राम

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये spoons of indore असे लिहिलेले आहे. 

सर्च केल्यावळ संपूर्ण व्हिडिओ आढळला, यामध्ये अर्धचंद्र आकाराचे तुकडे कापल्यानंतर तो व्यक्ती त्या तुकड्यांना तेलात तळतो आणि मसाला लावतो.

या पोस्टसोबत दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये कृत्रिम काजू तयार केले जात आहे. ती पोस्ट आपण इथे पाहू शकतात.

वरील पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये युजर्स लिहिताता की हे काजू नसून “काजू नमक पारे” आहेत.

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, महाराष्ट्रात दिवाळीमध्ये शंकरपाळे प्रमाणे मसाला काजू किंवा “काजू नमक पारे” फाराळात केले जातात. या पदार्थाची पाककृती आपण इथे पाहू शकतात.

खालील फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये हेच काजू नमक पारे आहेत.

फॅक्ट क्रेसेंडो याआधीसुद्धा याविषयी फॅक्ट-चेक प्रकाशित केलेले आहे. त्यावेळी बाजारात बनावट काजू तयार करण्याची मशीन आल्याचा दावा केला जात होता. परंतु, तो व्हिडिओ मैद्यापासून ‘काजू नमक पारे’ तयार करणाऱ्या मशीनीचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाला होता.

निष्कर्श 

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये कृत्रिम काजू बनवले जात नव्हते, हे अर्धचंद्र आकारात कापलेले काजू नमक पारे आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमध्ये बनावट काजू बनवले जात नसून ते ‘काजू नमक पारे’ आहेत; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading