
हैदराबाद येथील पशुचिकित्सकावरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर असे कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. अशा गुन्हेगारांना जागीच गोळ्या घाला, भरचौकात फाशी द्या, लोकांच्या हवाली करा, अशी अनेक प्रक्षोभक वक्तव्ये सोशल मीडियावर होत आहेत. यात भर म्हणून सौदी अरेबियामध्ये 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचा कसा शिरच्छेद करण्यात आला असे सांगत एक व्हिडियो फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्यता तपासण्याची विनंती केली.
काय आहे व्हिडियोमध्ये?
30 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये नारंगी रंगाच्या कपड्यातील काही लोक पिंजऱ्यात कैद असल्याचे दिसते. मग काळे कपडे घातलेला व्यक्ती त्यातील एकाला बाहेर काढतो आणि त्याला गुडघ्यावर बसवून तलवारीने त्याचा शिरच्छेद करतो. या व्हिडियोसोबत लिहिलेले आहे की, “16 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी बलात्कार करून तिला ठार मारले म्हणून सौदी अरेबियात त्या 7 लोकांना तिथल्या सरकारने दिलेली शिक्षा जरा न्याहाळून पहा !! महाराष्ट्रात पण आसंच झाल पाहीजे!!”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून हा व्हिडियो सौदी अरेबियातील नसल्याचे कळाले. अॅटलस प्रेस नामक वेबसाईटवरील माहितीनुसार, हा व्हिडियो इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या शिरच्छेदाचा आहे. कुर्दीश सैन्यासाठी हेरगिरी करण्याचा ठपका ठेवत इसिसने या इराकी नागरिकांना अशा निर्ममपणे ठार केले होते. यावेळीचे फोटो आणि व्हिडियो जगभरात शेयर करण्यात आले.

मूळ बातमी येथे वाचा – अॅटलस प्रेस । अर्काइव्ह
इराण न्यूज 24 नामक वेबसाईटवरील बातमीनुसार, शिरच्छेदप्रसंगी एक लहान मूलदेखील तेथे उपस्थित होते. इसिस दहशतवाद्यांनी या मुलासमोर इराकी नागरिकांची हत्या केली. काही लोकांचे तलवरीने शिरच्छेद तर, काहींना गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. इसिसतर्फे अशा प्रकारचे व्हिडियो दुष्पप्रचारासाठी पसरविले जातात.

मूळ पोस्ट येथे पाहा – इराण न्यूज 24 । अर्काइव्ह
सौदी अरेबियामध्ये बलात्कारासाठी काय शिक्षा आहे?
सौदी अरेबियामध्ये शरिया कायद्यानुसार न्यायप्रणाली आहे. सौदीमध्ये बलात्कारासाठी मृत्यूदंड देण्याची तरतूद असली तरी, बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात पिनल कोड नाही. तसेच बलात्काराची व्याख्यादेखील स्पष्ट नाही.
ही पोस्ट यापूर्वी फॅक्ट क्रेसेंडो गुजराती वेबसाईटने केली आहे. यापूर्वी येमेनमधील असाच एक व्हिडियो सौदी अरेबियाच्या नावे फिरत होता. फॅक्ट क्रेसेंडो मराठी त्याची पडताळणी केली होती.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, शिरच्छेदाचा हा व्हिडियो सौदी अरेबिया येथील नाही. हा व्हिडियो इराकमध्ये इसिस दहशतवाद्यांनी हेरगिरीच्या आरोपाखाली इराकी नागरिकांची केलेल्या हत्येचा आहे. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा खोटा आहे.

Title:इराकमध्ये ISIS ने केलेल्या शिरच्छेदाचा व्हिडियो सौदी अरेबियातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
