FACT-CHECK: भारतात बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सची विक्री केली जात आहे का?

False सामाजिक

भारतात कत्तलीसाठी गोवंशाची विक्री करण्यास मनाई आहे. असे असतानाही बीफ फ्लेवरचे मॅगी नूडल्स बाजारात विक्रीसाठी आल्याचा दावा केला जात आहे. बीफ फ्लेवरच्या मॅगी उत्पादनाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सच्या पॅकेटचा फोटो शेयर करून म्हटले जात आहे की, मॅगीने गोमांसचे फ्लेवर टाकणे चालू केले आहे. मी, माझा परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनी मॅगीचा बहिष्कार केला आहे.  कृपया आपण सर्वांनी याबाबत जागरूकता पाळून लोकांना मॅगीचा बहिष्कार करावयास सहकार्य करावे.

इतरांनी म्हटले की, गोमांसाचा फ्लेवर मॅगीमध्ये. हिदुंनी मॅगीवर बहिष्कार घालून मॅगीवाल्यांची औकात दाखवून देण्याची वेळ आली आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

ट्विटरवरदेखील मॅगीच्या बीफ नूडल्सबाबत दावे केले जात आहेत. युजर्सने मॅगीवर बहिष्कार टाकण्याचा आवाहन करीत लिहिले की, मॅगीने आता गोमांस विक्री सुरू केली आहे. मॅगीने आधी “शीशे” टाकून भारतीयांनी खाऊ घातले होते. आता या विदेशी कंपन्यांना धडा शिकवावाच लागेल. या होळीला केवळ स्वदेशीचाच स्वीकार करावा.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम मॅगीने खरंच बीफ फ्लेवर नूडल्स बाजारात आणले का याची माहिती घेतली. नेसले नावाच्या कंपनीअंतर्गत मॅगी हा नूडल्सचा ब्रॅड विक्री केला जातो. मॅगी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर ब्रँडतर्फे विक्री केल्या जाणाऱ्या उत्पादनांची माहिती दिलेली आहे. नूडल्स, सॉस, पास्ता असे विविध उत्पादनांची नावे वेबसाईटवर आहेत. परंतु, यामध्ये बीफ फ्लेवर नूडल्सची माहिती नाही. कंपनीतर्फे जर असे एखादे प्रोडक्ट विक्री केले जात असेल तर याची माहिती येथे असणे अपेक्षित आहे. पण तसे काही आढळले नाही. तुम्ही स्वतः येथे पाहू शकता – नेसले इंडिया प्रोडक्टस

मग मॅगीच्या आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर शोध घेतला असता, ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटवर बीफ फ्लेवर मॅगीची माहिती मिळाली. ऑस्ट्रेलियामध्ये ही बीफ फ्लेवरची मॅगी उपलब्ध असल्याचे वेबसाईटवर कळाले.

अधिकृत वेबसाईटला येथे भेट द्या – नेसले ऑस्ट्रेलिया

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने भारतात मॅगी ब्रँडची उत्पादने तयार करणाऱ्या नेसले इंडियाशी संपर्क साधून बीफ फ्लेवर मॅगीविषयी विचारणा केली. त्यांनी ट्विटरवर उत्तर देताना स्पष्ट केले की, नेसले इंडियातर्फे तयार करण्यात येणाऱ्या आणि विक्री केल्या जाणाऱ्या नूडल्समध्ये गोमांस (बीफ) किंवा गोमांसाचा स्वाद (बीफ फ्लेवर) टाकण्यात येत नाही.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, भारतात बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सची विक्री करण्यात येत नाही. बीफ फ्लेवर मॅगीच्या पॅकेटचा फोटो भारतातील नाही. ऑस्ट्रेलियामध्ये बीफ फ्लेवर मॅगी नूडल्स विक्री केले जातात. भारतामध्ये मॅगीच्या उत्पादनांत बीफ (गोमांस) वापरण्यात येत नाही, असे नेसले इंडिया कंपनीने फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.

Avatar

Title:FACT-CHECK: भारतात बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सची विक्री केली जात आहे का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False