
देशाच्या आर्थिकवाढीच्या दराला खीळ बसलेली असताना भारतीय रुपयाचे अवमूल्यन होणे ही चिंतेची बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरता भाव आर्थिक तज्ज्ञ चांगले मानत नाहीत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारतीय रुपया आता इतका घसरला असून त्याची किंमत बांग्लादेशचे चलन “टका”पेक्षाही कमी झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये गुगलवरील करन्सी कन्व्हर्टरचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा करण्यात आला आहे की, 72 वर्षांत पहिल्यांदा “रूपया” बांगलादेशी “टका” समोर कमजोर. 1 टका = 1.18 रूपये!
हाच मजकूर अनेकांनी फेसबुकवर शेयर केला आहे.

तथ्य पताळणी
सदरील पोस्टमधील स्क्रीनशॉटचे निरीक्षण केल्यावर कळते की, रुपया कमजोर नाही तर टकापेक्षा मजबूत आहे. पोस्टमधील स्क्रीनशॉटनुसार, एक रुपया म्हणजे 1.18 बांग्लादेशी टका. याचाच अर्थ की, तुम्ही जर 1 एक हजार रुपये घेऊन बांग्लादेशला गेले तर तुमच्याकडे तेथील सुमारे 1180 रुपये असतील. म्हणजे रुपयाची किंमत जास्त आहे. थोडक्यात काय तर पोस्टमध्ये “1 टका = 1.18 रुपये” असे लिहिण्याऐवजी “1 रुपया = 1.18 टका” असे लिहिले पाहिजे होते.
सदरील स्क्रीनशॉट 26 ऑगस्टचा आहे. मग भारतीय रुपया त्या तारखेच्या आसपास कधी कमजोर पडला होता का? गुगल करन्सी कन्व्हर्टरनुसार गेल्या महिन्याभरात भारतीय चलन बांग्लादेशी टकापेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे. ऑगस्ट महिन्यात बांग्लादेशी टका 1.15 च्या खाली कधी गेलाच नाही. याचाच अर्थ की, तो रुपयापेक्षा कमजोर होता.

या एक्सचेंच रेटनुसार, बांग्लादेशातील व्यक्ती जर 1000 टका घेऊन भारतात आली तर तिच्याकडे केवळ 852 रुपये राहतील. म्हणजे त्यांचे कमी होणार आणि आपले वाढणार. म्हणजे डॉलरच्या तुलनेत जरी रुपया घसरला असला तरी, तो बांग्लादेशी टकासमोर कमजोर ठरलेला नाही. सदरील फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा असत्य ठरतो.

निष्कर्ष
भारतीय रुपयाची किंमत बांग्लादेशी टकापेक्षा कमी झालेली नाही. पोस्टकर्त्याने चुकीचा अर्थ घेऊन तसा दावा केला आहे. गेल्या महिन्यात टकाची किंमत रुपयापेक्षा कमजोरच राहिलेली आहे. तसेच “1 रुपया = 1.18 रुपये” असा रेट सध्या सुरू आहे.

Title:FACT CHECK: 72 वर्षांत खरंच रूपया बांगलादेशी “टका”समोर कमजोर पडला का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
