FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या असतानाचा फोटो शेअर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. सदरील फोटो एटिड केलेला आहे. मूळ फोटोत मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. 

काय आहे दावा?

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटर वर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे दिसते. 

या सोबत त्यांनी लिहिले की, “हा फोटो बघा…कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं??”

मूळ पोस्ट – ट्विटर | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, सदरील फोटो मॉर्फ केलेला आहे. दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून हा फोटो तयार करण्यात आलेला आहे. 

राष्ट्रवादीचे पुणे प्रमुख प्रशांत जगताप यांनी शीतल म्हात्रेंच्या फोटोला उत्तर देताना मूळ दोन्ही फोटो पोस्ट केले. 

मूळ फोटोत स्पष्ट दिसते की, मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. खुर्चीवर कोणीच बसलेले नव्हते. तसेच सुप्रिया सुळेंचा फोटो 2021 मधील वेगळ्या कार्यक्रमामधील आहे.

सुप्रिया सुळेंच्या फेसबुक अकाउंटवरून 17 जानेवारी 2021 रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला होता. 

राजेश टोपे आणि दिलीप वळसे-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसमवेतचा तो फोटो 2021 मधील कोविडसंबंधी पंतप्रधानांसोबत झालेल्या एका ऑनलाईन बैठकीचा आहे. 

महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यांच्या शासकीय निवासस्थानातून तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि दिलीप वळसे-पाटील मंत्रालयातून बैठकीत सहभागी झाले होते.

बनावट फोटो शेअर करून बदनामी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शीतल म्हात्रे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीने मुंबई सायबर पोलिसांकडे म्हात्रेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी व्हायरल फोटोबद्दल स्पष्टीकरण दिले की, तो फोटो मुख्यमंत्री कार्यालय किंवा वर्षा शासकीय निवास्थानावरील नसून, शिंदे कुटुंबाच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानातील आहे. एकनाथ शिंदे त्या दिवशी त्यांच्या घरातून एका बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे तेथे ‘महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ‘ हा फलक ठेवण्यात आला होता. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे दाखविणारा फोटो बनावट आहे. दोन वेगवेगळे फोटो एडिट करून चुकीच्या दाव्यासह तो पसरविण्यात येते आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Altered