
चहाच्या मळ्याचा एक सुंदर फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, हा फोटो भारतातील आहे. या फोटोद्वारे म्हटले जात आहे की, अशा सौंदर्यपूर्ण शेतीमुळेच भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा फोटो भारतातील नाही. हा तर चीनमधील फोटो आहे.
काय आहे दावा?
वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या चहाच्या मळ्याचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उगाच भारताला कृषिप्रधान देश नाही म्हणत”.
कमेंटमध्ये अनेकांनी फोटो भारतातील असण्याविषयी शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी हा फोटो जपानमध्ये असल्याचे कमेंटमध्ये म्हटलेले आहे.
तसेच गेल्या वर्षी पत्रकार समीर अब्बास यांनी ट्विटर हाच फोटो शेअर करून तो केरळमधील असल्याचे म्हटले होते.

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
हा फोटो नेमका कुठला हे शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज केले असता कळाले की, हा फोटो ना भारतातील आहे, ना जपानमधील.
सीजीटीएन (CGTN) नावाच्या चीनी सरकारशी संलग्नित मीडिया कंपनीद्वारे हा फोटो 19 एप्रिल 2021 रोजी शेअर करण्यात आला होता. सोबतच्या माहितीनुसार, हा फोटो चीनमधील Zhejiang भागातील Jinhua शहरातील चहाच्या मळ्याचा आहे. सोबत या मळ्याचे विविध फोटोसुद्धा आपण पाहू शकता.
वसंत ऋतुच्या आगमनाआधी या भागात चहा गोळा केला जातो. सीजीटीएनच्या अरेबिक भाषेतील ट्विटर अकाउंटवरूनसुद्धा हे फोटो शेअर करण्यात आले होते.
या भागातील चहाच्या मळ्यांचे फोटो शोधल्यावर डिपॉजिट फोटो नावाच्या फोटो वेबसाईटवर काही फोटो मिळाले. या फोटोंमध्ये चहा मजूरांचे कपडे सारखेच दिसत आहेत. Jinhua शहरातील Wuyi प्रभागात हा चहाचा मळा आहे.


मूळ फोटो – डिपॉजिट फोटो
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, चीनमधील चहाच्या मळ्याचा फोटो भारताच्या नावाने व्हायरल होत आहे. हा विलोभनीय फोटो चीनच्या Jinhua शहरातील आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:चहाच्या मळ्याचा हा नयनरम्य फोटो भारतातील नाही; ही तर चीनमधील चहाची शेती
Fact Check By: Agastay DeokarResult: False
