
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. भारतातील राजकीय नेत्यांच्या भरमसाठ कमाईवर निशाणा साधत ओबामांविषयी एक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यानुसार, अमेरिकेसारख्या देशाचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेले ओबामा स्वतःच्या मुलींसाठी एक घरदेखील खरेदी करू शकले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
20 जून रोजी शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, दो बार अमेरिका का राष्ट्रपति रहकर भी ओबामा अपने बच्चों के लिए नया घर नहीं खरीद सका. जबकी भारत में की दो बार किसी गांव का सरपंच भी रह जाता है, तो तीन मंजिला कोठी पर पूर्व सरपंच लिखा होना आम बात होती है.
तथ्य पडताळणी
बराक ओबामा 2008 ते 2016 दरम्यान दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाला 4 लाख डॉलर्स एवढे वार्षिक वेतन असते. तसेच वर्षाला 50 हजार डॉलर्सचा भत्ता, एक लाख डॉलर्सचा विनाकर प्रवास भत्ता आणि मनोरंजनासाठी 19 हजार डॉलर्सचा भत्ता मिळतो. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्याला महिन्याला सुमारे 23 लाख रुपये मानधन दिले जाते. शिवाय कार्यकाळ संपल्यावर दोन लाख रुपयांची वार्षिक पेन्शनसुद्धा मिळते. मग ओबामा आठ वर्षांच्या कार्यकाळात स्वतःचे घरदेखील खरेदी करू शकले नाही का?
गुगलवर यासंबंधी शोध घेतल्यावर न्यूयॉर्क टाईम्स दैनिकातील 31 मे 2017 रोजीची एक बातमी सापडली. बातमीनुसार, बराक ओबामा यांनी 2017 साली राजधानी वॉशिंग्टन (डीसी) मधील केलोरमा भागात 8.1 मिलियन डॉलर्सचे एक आलिशान घर खरेदी केले होते. भारतीय चलनामध्ये त्याची किंमत सुमारे 56 कोटी 35 लाख 98 हजार रुपये एवढी होती. व्हाईट हाऊसपासून हे घर केवळ तीन किमी अंतरावर आहे. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बराक ओबामा कुटुंबासह याच घरात राहायला गेले होते.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूयॉर्क टाईम्स । अर्काइव्ह
डिप्लोमॅट्स आणि इतर बडे राजकारण्याचे वास्तव्य असलेल्या या भागात ओबामा यांनी हे घर खरेदी केले होते. विशेष म्हणजे खरेदी करण्यापूर्वी ती याच घरात भाड्याने राहायचे. सुमारे 8200 चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या या घरात नऊ बेडरूम्स आणि 8 बाथरूम्स आहेत. सन 1921 साली बांधण्यात आलेल्या या घराचे 2011 मध्ये नुतनीकरण करण्यात आले होते. वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार, ओबामांचे हे नवे घर या भागातील दुसऱ्या क्रमांकाचे महागडे घर होते. अॅमेझॉनचा मालक जेफ बेझोसचा बंगलासुद्धा (किंमतः 23 मिलियन डॉलर्स) याच भागात आहे.

मूळ लेख येथे वाचा – सीएनबीसी । अर्काइव्ह
विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी बराक ओबामा शिकागो शहरात वकिल होते. तेथेदेखील त्यांचे स्वतःचे घर आहे. त्याचे नाव हाईड पार्क आहे. त्यांनी 2005 साली 1.5 मिलियन डॉलर्समध्ये हे घर खरेदी केले होते. बराक ओबामांच्या नवे घर कसे आहे याचे विविध फोटो पाहायचे असेल तर येथे क्लिक करा किंवा खाली दिलेला व्हिडियो पाहू शकता.
मग ओबामांनी मुलींसाठी काय केले?
बराक ओबामा यांनी त्यांची दोन्ही मुली – मेलिया आणि साशा – यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 50 हजार आणि एक लाख डॉलर्सचे ब्राईट डिरेक्सन्स एज-बेस्ड ग्रोथ प्लॅन खरेदी केले होते. त्यांची मोठी मुलगी हार्वडमध्ये शिकते. ओबामा यांची एकुण संपती 40 मिलियन डॉलर्स आहे. 2005 साली अमेरिकन सिनेटमध्ये येण्यापूर्वी ते वकिल म्हणून वर्षाला 85 हजार डॉलर्स कमाई करीत होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून पायउतार झाल्यानंतर त्यांची संपत्ती 20 मिलियन डॉलर्स इतकी झाली होती. ओबामांच्या कमाईविषयी सविस्तर फोर्ब्स वेबसाईटवर वाचू शकता.
निष्कर्ष
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2017 साली वॉशिंग्टन येथे 8.1 मिलियन डॉलर्स किंमतीचे आलिशान घर खरेदी केले होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्ष राहुनही घर न घेण्याचा दावा खोटा आहे.

Title:दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहूनही बराक ओबामा यांनी स्वतःचे घर खरेदी केले नाही का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
