
दरवर्षी 14 फेब्रुवारीच्या आसपास ‘व्हॅलेंटाईन्स डे’ विरोधात अनेक मेसेज फिरत असतात. या दिवशी प्रेमदिन साजरा करण्याऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले जाते. तसेच 14 फेब्रुवारीलाच शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना इंग्रजांनी फाशी दिल्याचा दावा केला जातो. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये म्हटले की, दुर्दैव देशाचे….😢 14 फेब्रुवारी पुलवामा हल्ला. 14 फेब्रुवारी मा.शहीद भगत सिंग, मा. राजगुरू, मा .सुखदेव यांचा बलिदान दिन पण आम्ही हे सोयीस्करपणे विसरतो पण पाश्चात्य व्हॅलेंटाईनला मात्र छान लक्षात ठेवतो.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना खरंच 14 फेब्रुवारी रोजी फाशी दिली होती का याचा शोध घेण्यासाठी इंटरनेटवर माहिती घेतली. महाराष्ट्र प्रशासनाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोषातील माहितीनुसार, भगतसिंग यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती. ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल या दोन अन्यायकारक विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेतील सभागृहात बॉम्ब फेकला होता. त्यानंतर दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. त्यांना लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात 23 मार्च 1931 रोजी त्यांच्या फाशीवर अंमलबजावणी करण्यात आली.
2015 साली भगतसिंग यांच्या 84 व्या बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे डेथ वॉरंट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इंडिया टुडेने याची बातमी प्रकाशित केली होती. यामध्येसुद्धा भगतसिंग यांना 23 मार्च रोजी फाशी झाल्याचे म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे
भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर लाहोरच्या मध्यवर्ती तुरंगाच्या अधीक्षकांनी याचा अहवाल वजा पत्र प्रशासनाला पाठवले होते. त्याची एक कॉपी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. यामध्येसुद्धा स्पष्ट लिहिले आहे की, भगतसिंग यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती.

भगतसिंग यांना फाशी दिल्याची बातमी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. द ट्रिब्युन वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट खाली पाहू शकता. पेपरची तारीखसुद्धा 14 फेबुवारीच्या आसपासची नसून, 25 मार्च आहे. यावरून हे सिद्ध होते की, भगतसिंग यांना व्हेलेंटाईन्स डे रोजी फाशी देण्यात आली नव्हती.

निष्कर्ष
शहीद भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना 14 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली नव्हती. त्यांना लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात 23 मार्च 1931 रोजी फाशी झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर पसरणारा मेसेज खोटा आहे.

Title:शहीद भगतसिंग यांना 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली नव्हती. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
