बिहारच्या एका मुलाने ‘गुगलचे इंजिन’च हॅक केले आणि ही गोष्ट जेव्हा गुगल कंपनीला कळाली तेव्हा त्यांनी या हॅकर मुलाला 3.66 कोटी रुपये पगाराची नोकरी दिली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज चौधरी नावाच्या मुलाने ही कीमया केली, असा दावा केला जात आहे. मराठी वर्तमानपत्रांनीसुद्धा याची बातमी प्रसिद्ध केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) मेसेज पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की या मेसेजमध्ये निव्वळ फेकाफेकी आहे.

काय आहे मेसेजमध्ये?

मेसेजनुसार, बिहारमधील ऋतुराज चौधरी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने परवा रात्री एका मिनिटासाठी गुगलचे इंजिन हॅक केले आणि त्याची माहिती कंपनीला दिली. त्याचे अफाट कौशल्य पाहून गुगलने त्याला 3.66 कोटी रुपयांची नोकरी दिली. एवढेच नाही तर भारत सरकारला विनंती करून केवळ दोनच तासांत त्याचा पासपोर्ट तयार करून दिला.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

सकाळ वृत्तपत्रानेसुद्धा ही बातमी दिली, की “गुगल हॅक केल्यानंतर त्या मुलाला कंपनीकडून कोट्यवधींच्या पगार देत नोकरीची ऑफर दिल्याचे एका अहवालात म्हटले आहे.” (अर्काइव्ह)

महाराष्ट्र टाईम्सनेसुद्धा “विद्यार्थ्याने शोधला साइटवरील बग, गुगलकडून थेट नोकरीची ऑफर!” या मथळ्यासह बातमी प्रसिद्ध केली.

मग काय खरं आहे?

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे प्रकरण काय आहे ते पाहुया. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, बिहारच्या बेगुसराय येथील ऋतुराज चौधरी नावाच्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गुगलच्या एका प्रोडक्टमधील बग (त्रुटी) शोधून काढला. या त्रुटीमुळे हॅकर्सला गुगल प्रोडक्टमधील डेटा मिळवता येणे शक्य झाले असते. ही गंभीर बाब ऋतुराजने शोधून काढल्याबद्दल गुगलने त्याचे कौतुक करत संशोधकांच्या यादीत त्याचा समावेश केला.

गुगलने त्याला कोट्यवधी रुपयांची नोकरी दिल्याचा बातमीत कुठेही उल्लेख नाही.

https://www.youtube.com/watch?v=7A9ZtEMU7hg

फॅक्ट क्रेसेंडोने मग ऋतुराज चौधरीशी संपर्क साधला. गुगलकडून 3.66 कोटी रुपये पॅकेजच्या नोकरीची ऑफर आल्याची माहिती खोटी असल्याचे त्याने सांगितले. ऋतुराज ट्रिपल-आयटी मणिपूर कॉलेजचा सेकंड इयरचा विद्यार्थी आहे.

लिंक्डइन नावाच्या प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर त्याने स्वतःदेखील याबाबत खुलासा केला आहे.

“गुगलकडून मला कोणतेही पॅकेज किंवा नोकरी मिळालेली नाही. शिवाय मी गुगलसुद्धा हॅक केले नव्हते. मी केवळ एक बग शोधून काढला. सध्या मी बीटेक पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकतोय. माझ्याविषयी समाजमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरविल्या जात आहे,” असे ऋतुराजने पोस्टमध्ये म्हटले आहे.

ऋतुराजने नेमके काय केले?

तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कंपन्यांतर्फे त्यांच्या सिस्टिममध्ये असणाऱ्या तांत्रिक व सुरक्षेसंदर्भातील त्रुटी शोधून काढण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलोपर्स, प्रोग्रामर्स आणि अभ्यासकांना आवाहन केले जाते. यालाच बग बाऊंटी प्रोग्राम म्हणतात. गुगलतर्फेसुद्धा असा एक प्रोग्राम चालविण्यात येतो. त्रुटी शोधुन काढण्याऱ्यांना कंपन्यांतर्फे रोखरक्कमदेखील जाते.

ऋतुराजनेसुद्धा अशाच बग बाऊंटीअंतर्गत गुगलच्या सिस्टिमधील एक त्रुटी शोधून काढली. सायबरसुरक्षेच्या भाषेत त्रुटींचे P5 ते P0 अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते. P0 ग्रेड म्हणजे सिस्टममला सर्वात मोठा धोका असलेली त्रुटी. ऋतुराजने शोधलेल्या bug ची श्रेणी P2 आहे.

ऋतुराज अद्यापही या प्रॉब्लेमवर काम करत असून, त्याच्या शोधकार्याची गुगलने दखल घेतलेली आहे.

मूळ पोस्ट – लिंक्डइन

लल्लनटॉपशी बोलताना ऋतुराजने सांगितले की, तो आय-आय-आय-टी मणिपूर कॉलेजमध्ये शिकतो. सोशल मीडियावर तो आयआयटीचा विद्यार्थी असल्याचे चुकीचे बोलले जात आहे. तसेच त्याचा भारत सरकारतर्फे दोन तासांत पासपोर्ट तयार करण्यात आला नाही.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ऋतुराज चौधरी याला गुगलने 3.66 कोटी रुपयांची नोकरी दिली ही बातमी निराधार आहे. तसेच त्याने गुगल हॅकसुद्धा केले नव्हते. त्याने केवळ गुगल सिस्टिममधील एक बग शोधून काढला आणि त्याबदल्यात गुगलकडून त्याला हॉल ऑफ फेम आणि संशोधकांच्या यादीत स्थान मिळाले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:निव्वळ फेकाफेकीः गुगल हॅक केले म्हणून बिहारच्या तरुणाला 3.66 कोटींची जॉब ऑफर?

Fact Check By: Agastya Deokar

Result: Partly False