
इस्रायल हा देश कडव्या राष्ट्रप्रेमासाठी प्रसिद्ध आहे. याचे उदाहरण म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका जखमी महिलेचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, इस्रायलमधील एका अभिनेत्रीने इस्रायलविरोधी वक्तव्य केल्यामुळे तेथील लष्कराने तिला गोळी मारून कायमचे अपंग केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. ही अभिनेत्री इस्रायलची नागरिक नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “इस्रायलने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे. तेथे लोकप्रिय होऊन पैसे कमविणाऱ्या अभिनेत्रीने इस्रायलच्या शत्रू राष्ट्रांना समर्थन देत स्वतःच्या देशावरच प्रश्न उभे केले. त्यामुळे इस्रायलमधील सुरक्षबलाने तिला गोळी मारून अपंग केले.”

मुळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
व्हायरल पोस्टमधील महिला कोण आहे ? याचा शोध घेण्यासाठी फोटोला रिव्हार्स ईमेज केले असता कळाले की, पोस्टमधील महिलेचे नाव मैसा अब्द इलाहादी असून ती अभिनेत्री आहे.
मैसाने इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःला पॅलेस्टाईनची नागरिक म्हटलेले आहे.
तसेच बीबीसीच्या चॅनल 4 वेबसाईटल मुलाखत देताना तिने म्हटले होते की, “मी पॅलिस्टीनी नागरिक आहे; परंतु प्रत्येक देश जो गुलामगिरीला बळी पडला आहे, त्यांचे प्रतिनिधित्व करणे ही माझी जबाबदारी आहे.”
म्हणजेच, अभिनेत्री मैसा अब्द इलाहादी इस्रायलची नागरिक नाही.

का मारली होती गोळी?
गेल्या वर्षी इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली होती. हल्ल्यामुळे अनेक लोक जखमी झाले आणि मोठ्या संख्येने लोकांना प्राण गमवावा लागला होता. या दरम्यान हिफा शहरात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते.
मैसा अब्द इलाहादी हिने 13 मे 2021 रोजी हिफा शहरातील आंदोलनात सहभाग घेतला होता. इन्स्टाग्रामवर माहिती देताना तिने सांगितले होते की, “रविवारी मी हिफा शहरात शांततापूर्ण निदर्शनात सहभाग घेतला होता. थोड्या वेळानंतर एका सैन्याने अश्रुधुराच्या कांड्या आणि गोळीबारास सुरुवात केली.”
पुढे मैसाने या पोस्टमध्ये सांगितले की, आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळातच पायाला गोळी लागली आणि उपचारानंतर आपल्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, इस्रायलविरोधात वक्तव्य केल्याबद्दल तेथील लष्कराने इस्रायलच्याच अभिनेत्रीला गोळी मारून कायमस्वरूपी अपंग केले नाही. ही अभिनेत्री पॅलेस्टीनी नागरिक आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:स्वतःच्याच देशाविरोधात वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीला इस्रायलच्या लष्कराने गोळी मारून अपंग केले का?
Fact Check By: Sagar RawateResult: False
