
कुवैतमधील सर्वात श्रीमंत बादशहाचा आज मृत्यू झाला, अशा दाव्यासह एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये शवपेटी, सोन्याचे विमान, यॉट, फर्निचर, हिऱ्यांनी मढवलेला जिना, सोन्याची बिस्किटे, नोटांचे ढीग असे फोटो शेयर करून त्याची श्रीमंती म्हणून दाखवले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे आढळले.
काय आहे दावा?
सोन्याने मढवलेल्या आलिशान मालमत्तेचे फोटो शेयर करून मेसेजमध्ये लिहिले आहे की, “कुवेत मधला सर्वात श्रीमंत बादशाह नसिर अल खरी आज मेला, त्याची संपत्ती पाहून डोळे विस्पारतील, जगातले सर्व श्रीमंत अवाक होतील एवढी श्रीमंती होती, पण हे जग सोडून जाताना त्यातला एकही कण घेऊन जाऊ शकला नाही, म्हणुनच म्हणतात ना, माणूस येतानाही मोकळा येतो आणि जातानाही मोकळा जातो याचे ज्वलंत उदाहरण जगापुढे ठेवलं.”

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम शवपेटतील व्यक्ती कोण हे तपासू. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्यक्ती कुवैतमधील नाही.
‘मेट्रो’ वेबसाईटवरील 4 एप्रिल 2018 रोजीच्या बातमीनुसार, हा फोटो त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाचा आहे. शेरोन सुखेडो (वय 33) असे त्याचे नाव होते. त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
आपल्या श्रीमंतीचा बाज दाखविण्यासाठी तो प्रसिद्ध होता. त्यानुसारच त्याच्यावर अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले होते. महागड्या शॅम्पेनमध्ये आंघोळ घालून त्याला सुमारे एक लाख डॉलर किमतीच्या दागिन्यांसह सोन्याच्या पेटीत दफन करण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील स्थानिक मीडियानेसुद्धा त्याच्या निधन बातमी दिली होती.

मूळ पोस्ट – मेट्रो । अर्काइव्ह
यावरून स्पष्ट होते की, हा व्यक्ती कुवैतमधील कोणी नसिर अल खरी नावाचा श्रीमंत माणून नाही.
मग आलिशान मालमत्तेचे फोटो कोणाचे आहेत?
व्हायरल होत असलेल्या फोटोंना एक-एक करीत रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ते इंटरनेटवरून जमा केलेले आहेत.
फोटो क्र. 1

सत्य – हा फोटो अमेरिकेतील शिकोगा येथील मनी म्युझियम येथील आहे. एक मिलियन डॉलर किमतीच्या नोटा येथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत.
संदर्भ – Federal Reserve Bank of Chicago’s Money Museum
फोटो क्र. 2

सत्य – ड्रग्सची तस्करी करणाऱ्या Zhenli Ye Gon नामक व्यावसायिकाच्या घरातून अमेरिकन पोलिसांनी 2007 साली सुमारे 205 मिलियन डॉलर रकमेची रोकड जप्त केली होती. हा त्याचा फोटो आहे.
संदर्भ – AFP
फोटो क्र. 3
सत्य – खलिलाह (Khalilah) नावाची आलिशान यॉट आहे. ती भाडेतत्वावर उपलब्ध आहे.
संदर्भ – Yacht Charter Fleet
फोटो क्र. 4

सत्य – हे Dassault Falcon 900B नावाचे विमान आहे. आझरबैजान येथील व्यावसायिक Telman Izmailov त्याचे मालक आहेत.
संदर्भ – Air Liners
फोटो क्र. 5

सत्य – गोल्ड क्रोमचा कोट असलेली ही रोल्स रॉईल ड्रॉपहेड कार आहे. चित्रपट निर्माता व अभिनेता स्टीव्ह गोल्डफिल्ड यांची ती कार आहे.
संदर्भ – Wrap Folio
फोटो क्र. 6

सत्य – बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलेल्या सोन्याचा हा फोटो आहे.
संदर्भ – The Guardian
कुवैतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?
व्हायरल मेसेजमध्ये दिलेले नावाचा (नसिर अल खरी) कोणी व्यक्ती आढळला नाही. परंतु, या नावाची साधर्म्य असलेले एक श्रीमंत व्यक्ती कुवैतमध्ये होते. Nasser Al-Kharafi असे त्यांचे नाव. 2011 साली त्यांचा मृत्यू झाला. फोर्ब्सने दिलेल्या बातमीनुसार, त्यांची संपत्ती 10 बिलियन डॉलर्स इतकी होती. फोर्ब्सच्या 2011 मधील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 77 व्या स्थानावर होते.
Kutayba Alghanim सध्या कुवैतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या 2020 मधील यादीनुसार ते जगातील 1613 क्रमांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

मूळ यादी – Forbes Billionaire 2020
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील व्यावसायिकाचा फोटो शेयर करून तो कुवैतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून शेयर केला जात आहे. तसेच इंटरनेटवरील असंबंधित फोटो त्याची श्रीमंती म्हणून सांगतिले जात आहेत.

Title:व्हायरल होत असलेले ते फोटो कुवैतमधील सर्वात श्रीमंत माणसाचे नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
