
आहार आणि जीवनशैलीत बदल करून कशाप्रकारे आपण शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवू शकतो, यासंबंधी मार्गदर्शन करणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. व्हिडियोमध्ये मुंबईतील केईएम हॉस्पीटलचे डीन (अधिष्ठाता) डॉ. कोठारी मार्गदर्शन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
मुंबई केईएम हाँस्पिटलचे डीन डॉ. कोठारी यांनी कँल्शिएम बद्दल सांगितलेले दोन शब्द! असा मेसेज असलेला एक व्हिडियो तुम्ही व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर पाहिला असेल. एकुण 4.42 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्याचे उपाय सांगत आहे. रोज संत्री, मोसंबी, कडीपत्ता खाण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आला आहे. हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून, केईएमचे डीन डॉ. कोठारी आहेत असा दावा केल्यामुळे लोकदेखील हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करीत आहेत.

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडियोतील व्यक्ती खरंच केईएम हॉस्पीटलचे डीन डॉ. कोठारी आहेत का याचा शोध घेतला. केईएम हॉस्पीटल हे मुंबईतील प्रसिद्ध सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या वेबसाईटवर शोध घेतला असता कळाले की, डॉ हेमंत देशमुख तेथील विद्यमान डीन आहेत.
मग या आधी कोणी डॉ. कोठारी डीन होते का?
फॅक्ट क्रेसेंडोने विद्यमान डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी हा सदरील व्हिडियो पाहून स्पष्ट सांगतिले की, व्हिडियोत दिसणारा व्यक्ती केईएम हॉस्पीटलशी संबंधित नाही.
त्यांनी माहिती दिली की, डॉ. मनू कोठारी नावाचे डॉक्टर केईएममध्ये अॅनाटॉमी विभागाचे प्रमुख होते. त्यांचे 2014 साली निधन झाले. परंतु ते केईएम रुग्णालयाचे डीन नव्हते. आणि राहिला प्रश्न व्हिडियोतील व्यक्तीचा तर ती केईएमचे डॉ. मनू कोठारी नाहीत.
केईएमच्या डीनच्या म्हणण्यावरून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडियोतील व्यक्ती डॉ. कोठारी नाहीत. तसेच त्यांचा केईएम रुग्णालयाशी काही संबंध नाही.
मग हा व्हिडियो नेमका कोणाचा आहे?
व्हिडियोतील व्यक्ती गुजरातमधील निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज धाबी आहेत. वडोदरा येथे त्यांचे निसर्ग क्लिनिक नावाचे रुग्णालय आहे. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांचे पुत्र गुंजन धाबी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी माहिती दिली की, व्हिडियोतील व्यक्ती माझे वडिल डॉ. पंकज धाबी आहेत. काही वर्षांपूर्वी ब्रह्म कुमारी केंद्रामधील एका कार्यक्रमात बोलतानाचा हा व्हिडियो आहे. त्यांचा व्हिडियो लोक डॉ. कोठारी यांच्या नावाने पसरवित आहेत. डॉ. पंकज धाबी यांचे 2018 मध्ये निधन झाले.
डॉ. धाबी यांनी 1987 पर्यंत खाजगी नोकरी करीत होते. त्यानंतर आवड आणि छंद म्हणून त्यांनी निसर्गोपचाराची (Naturopathy) प्रॅक्टिस सुरू केली. नॅशनल गांधी अकॅडमी येथून त्यांनी 2002 साली निसर्गोपचार आणि योग विषयात डिप्लोमा मिळवला. त्यांच्याविषयी अधिक येथे वाचा.
डॉ. मनू कोठारी कोण होते?
डॉ. कोठारी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1935 रोजी झाला होता. त्यांचे वैद्यकीय शिक्षण केईएममध्ये झाले आणि तेथेच ते अॅनाटॉमी विभागात प्राध्यापक म्हणून 1963 साली रुजू झाले. सुमारे तीस वर्षे सेवा दिल्यानंतर ते 1993 साली निवृत्त झाले. त्यांनी The Other Face of Cancer, Living Dying: A New Perspective on the Phenomena of Life, Disease and Death, कॅन्सरची दुसरी बाजू अशा काही पुस्तकांचे लेखनदेखील केले. त्यांच्या नावाने केईएममध्ये डॉ. मनू कोठारी चेयर ऑफ मेडिकल ह्युमॅनिटिज हा विभागदेखील आहे. त्यांच्याविषयी सविस्तर येथे वाचा.
डॉ. कोठारी यांचे 16 ऑक्टोबर 2014 रोजी निधन झाले. तत्पूर्वी 2013 साली त्यांनी टेडमेड कार्यक्रमात लेक्चर दिले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.
मग व्हिडियोतील उपाय कितपत योग्य आहेत?
व्हिडियोतील उपाय पूर्णतः खरे आहे असे म्हणता येणार नाही, असे केईएमचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी माहिती दिली. केईएमच्या एंडोक्राईनोलॉजी (Endocrinology ) विभागाचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर यांनी व्हिडियोत सांगतलेले उपाय कितपत योग्य आणि कितपत अयोग्य याचे खालीलप्रमाणे विश्लेषण केले आहे.
ते म्हणाले की, मोसंबी आणि संत्री या फळांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम-C असते. त्याचा आणि कॅल्शियमचा काही संबंध नाही. एका मोसंबीमध्ये 60 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. ही मात्रा अगदीच नगण्य आहे. 60 मिली दुध पिल्यावरही तेवढे कॅल्शियम मिळते. त्यामुळे मोसंबी किंवा संत्रीचा आहारात समावेश केल्यावर कॅल्शियमची पातळी वाढते, असा दावा करता येणार नाही. मानवी शरीरासाठी दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे.
सकाळी आणि सायंकाळी उन्हात बसणे चांगली सवय आहे. सुर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये व्हिटॅमिन-D तयार होते. परंतु, व्हिडियोत सांगितल्याप्रमाणे सुर्यप्रकाशामुळे पॅराथॉयराईड ग्लँड सक्रिय होत नाहीत. शरीरात हार्मोन्समुळे व्हिटॅमिन-डी तयार होत नाही. व्हिटॅमिन-डी केवळ सुर्यप्रकाशापासून बनते. बाकी कशापासून ते तयार होत नाही. तसेच सिलिकॉन आणि व्हिटॅमिन-D यांच्या मिश्रणाने कॅल्शियम सेल तयार होत नाहीत.
केईएमचे डॉ. मनू कोठारी आणि व्हायरल व्हिडियोतील व्यक्ती यांची तुलना केल्यावर लगेच स्पष्ट होते की, दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत. चुकीच्या दव्यासह हा व्हिडियो पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष
केईएमचे डॉ. कोठारी यांच्या नावे फिरवला जाणारा व्हिडियो खोटा आहे. तो व्हिडियो गुजरातमधील निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज धाबी यांचा आहे. काही वर्षांपूर्वी ब्रह्म कुमारी केंद्रातील कार्यक्रमातील हा व्हिडियो आहे. तसेच डॉ. मनू कोठारी केईएमचे डीन नव्हते. ते अॅनाटॉमी विभागाचे प्रमुख होते.

Title:केईएम हॉस्पीटलचे डॉ. कोठारी यांच्या नावे फेक व्हिडियो व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
