FAKE QUOTE: “दुर्दैवाने मी हिंदु आहे” असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी म्हटले होते का?

False राजकीय

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी निरनिराळे खोटे दावे प्रचलित आहेत. त्यांचे फोटो, निर्णय, विचारसरणी, धर्म, राजकारण यावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट अधुनमधून सोशल मीडियावर येत असतात. यात आणखी भर म्हणजे त्यांच्या नावे केले जाणारे एक वादग्रस्त विधान शेयर होत आहे. “मी शिक्षणाने ख्रिश्चन, संस्कृतीने मुस्लिम आणि दुर्दैवाने हिंदु आहे”, असे पं. नेहरू म्हटल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

एका युजरने 26 जून रोजी ही पोस्ट शेयर केली होती. नेहरुंचा फोटो देऊन त्यांच्या नावे पुढील विधान लिहिलेले आहे – मैं शिक्षा से ईसाई, संस्कृती से मुस्लिम, दुर्भाग्य से हिंदू हूं. हेच विधान इंग्रजीतूनही दिले आहे. I am Englishman by education, Muslim by culture and Hindu merely by accident.

तथ्य पडताळणी

विविध वेबसाईटवर नेहरुंच्या नावानेच वरील विधान दिल्याचे आढळले. परंतु, नेहरूंनी असे विधान कधी, कुठे, कोणापाशी केले याचा कोणताही संदर्भ कुठेच दिला जात नाही. त्यामुळे विधानाच्या मूळ स्त्रोताबाबत संशय घेण्यास वाव आहे. गुगलवर याबाबत शोध घेतला असता वेबदुनिया वेबासाईटवरील एक लेख मिळाला. या लेखात डेक्कन क्रोनिक्लस वृत्तपत्राने 19 नोव्हेंबर 2018 रोजी नेहरूंच्या नावाने वरील विधान प्रकाशित केल्याचे म्हटले आहे. त्यावरून ट्विटर युजर्सरने वृत्तपत्राची चूक निदर्शनास आणून दिली. गौरव पांथी नावाच्या व्हेरिफाईड युजरने ट्विट करून सांगितले की, हिंदु महासभेचे तत्कालिन अध्यक्ष एन. बी. खरे यांनी नेहरूंचे वर्णन करताना 1950 साली हे विधान केले होते.

अर्काइव्ह

सदरील युजरने पुरावा म्हणून शशी थरूर यांच्या “नेहरू – द इन्व्हेशन ऑफ इंडिया” या पुस्तकाचा दाखला दिला आहे. गुगल बुक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकात शशी थरूर यांनी लिहिले की, हिंदु महासभेचा अध्यक्ष एन. बी. खरे यांनी नेहरुंचे वर्णन करताना म्हटले होते की, ते शिक्षणाने इंग्लिश आहेत, संस्कृतीने मुस्लिम तर केवळ जन्माने हिंदू आहेत. नेहरूंची बदनामी करण्यासाठी त्यांनी असे म्हटले. परंतु, वैविध्यपूर्ण संस्कृतीच्या मुशीतून तयार झालेल्या नेहरूंचे हे एक प्रकारे योग्यच वर्णन ठरेल.

मूळ पुस्तक गुगल बुक्स येथे वाचा – नेहरूः द इन्व्हेशन ऑफ इंडिया

डेक्कन क्रोनिकल्स वृत्तपत्रानेदेखील 25 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अंकात आपली चूक मान्य करीत माफी मागितली. त्यांनी लिहिले की, 19 नोव्हेंबरच्या अंकात “अपघाताने मी हिंदू आहे”, असे नेहरुंच्या नावे आम्ही चुकीचे विधान छापले. मूळात ते विधान एन. बी. खरे यांनी नेहरुंचे वर्णन करताना केले होते. गौरव पांधी यांनी वृत्तपत्राचा खुलासा ट्विट केला होता.

अर्काइव्ह

एन. बी. खरे यांच्या नावे वरील विधानाचा संदर्भ बलराम नंदा लिखित “दि नेहरुज्- मोतीलाल अँड जवाहरलाल” (1974) या पुस्तकातही आढळतो. त्यात ते नेहरू पिता-पुत्राबद्दल लिहितात की, मोतीलाल नेहरू यांनी बुरसटलेल्या हिंदु पद्धती झुगारून मुस्लिम कारकून आणि नोकरांना आपल्याकडे कामाला ठेवले होते. तसेच पर्शियन साहित्य आणि उर्दू कवितांच्या तर ते आकंठ प्रेमात होते. मोतीलाल आणि जवाहरलाल दोघांचाही मोठा मुस्लिम मित्रपरिवार होता. त्यामुळे अनेकदा त्यांना मुस्लिमधार्जिण म्हटले जाई. हिंदु महासभेचे नेते एन. बी. खरे यांनी जवाहरलाल नेहरुंचे वर्णन – शिक्षणाने इंग्लिश, संस्कृतीने मुस्लिम आणि केवळ अपघाताने हिंदु म्हणून जन्माले आहेत – असे केले होते. 

मूळ पुस्तक गुगल बुक्स येथे वाचा – दि नेहरुज्- मोतीलाल अँड जवाहरलाल

क्विंट वेबसाईटवर 27 मे 2018 रोजीच्या एका लेखात ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे तत्कालिन मंत्री एम. जे. अकबर यांनी सांगितले होते की, नेहरू केवळ अपघाताने हिंदु असल्याचा उल्लेख एन. बी. खरे यांनी केला होता. हे विधान चुकीच्या पद्धतीने नेहरूंच्या नावे पसरविले जाते. मुळात ते त्यांचे वर्णन करताना टीकाकाराने केले होते. नेहरूंचे विरोधक मात्र नेहरुंनीच असे म्हटल्याचा अपप्रचार करतात. हे विधान सर्वप्रथम ऑल्ट न्यूजने फॅक्ट चेक केला होता.

मूळ लेख येथे वाचा – द क्विंट

निष्कर्ष

शिक्षणाने इंग्लिश/ख्रिश्चन, संस्कृतीने मुस्लिम आणि केवळ अपघाताने हिंदु आहे, हे विधान जवाहरलाल नेहरूंनी केले नव्हते. हिंदु महासभेचे तत्कालीन अध्यक्ष आणि टीकाकार एन. बी. खरे यांनी नेहरूंचे वर्णन करताना ते केले होते. नेहरुंच्या नावे ते चुकीने पसरविले जाते. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title: FAKE QUOTE: “दुर्दैवाने मी हिंदु आहे” असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी म्हटले होते का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False