पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही; वाचा सत्य

Coronavirus False

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, पुण्यात डॉक्टर असणाऱ्या मेघा व्यास नामक महिलेचे कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले. एका महिलेचा फोटो पोस्ट करून दावा केला जातोय की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना लागण झाली होती.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टकर्त्याने महिलेचा फोटो शेयर करून म्हटले की, कोरोना रुग्णांची सेवा करताना कोरोना संक्रमित झालेल्या पुण्यातील डॉक्टर मेघा व्यास यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्या देशभक्तीला सलाम.

फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी व्हॉट्सअपवरदेखील ही पोस्ट पाठवून त्याची सत्यता विचारली.

megha-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्हफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर विविध की-वर्ड्सने शोध घेतला असता कळाले की, राजस्थानच्या जोधपूर भागात याविषयी अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यांची पडताळणी केली असता कळाले की, मेघा व्यास यांच्या निधनाविषयी खोटे दावे करण्यात येत आहेत. 

सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे फॅक्ट क्रेसेंडोने मग मेघा यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट खोट्या आहेत. मेघा यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही. तसेच त्या डॉक्टर नव्हत्या.

Thanvi-1.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

फॅक्ट क्रेसेंडोने मग मेघा यांचे पती डॉ श्रीकांत शर्मा यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी मेघा यांचे निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालसुद्धा निगेटिव्ह आला. 

त्यांनी जहांगीर हॉस्पिटलचे पत्र फॅक्ट क्रेसेंडोला पाठवले. यामध्ये स्पष्ट म्हटले की, त्यांना कोरोना नव्हता. निधनाचे कारण तीव्र न्युमोनिया सांगितले आहे.

सोशल मीडियावरील दाव्यांविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी पुणे येथे डॉक्टर आहे. माझी पत्नी एक गृहीणी होती. सोशल मीडियावर तिच्या निधनाविषयी अनेक चुकीचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मेघा यांच्या विषयी खोट्या पोस्ट न पसरविण्याचे आवाहन शर्मा कुटुंबाने केले आहे.

खबरदार! खोट्या पोस्ट शेयर कराल तर…

मेघा यांच्याविषयी खोटी पोस्ट शेयर करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे डॉ. श्रीकांत यांनी सांगितले आहे. “माझ्या पत्नीच्या फोटोचा गैरवापर करून असत्य दावे केले जात आहेत. जे कोणी असे करेल त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहोत. त्यामुळे कोणीही खोट्या पोस्ट शेयर करू नये,” असा इशार त्यांनी दिला.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या फोटोतील महिलेचे खरे नाव मेघा श्रीकांत शर्मा (वय 33) असून, त्या डॉक्टर नाहीत. तसेच त्यांचे निधन कोरोनामुळे झालेले नाही. त्या पुणे येथील एक गृहिणी होत्या. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Avatar

Title:पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


1 thought on “पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही; वाचा सत्य

Comments are closed.