ARTI-FACT: इजिप्तमध्ये प्राचीन मकबऱ्याखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या का?

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

इजिप्त म्हणजे प्राचीन इतिहासाची बंद पेटीच आहे. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या जशासतशा पाऊलखुणा येथे सापडतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये मकबऱ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून तर नवनवीन विशाल आणि ऐसपैस मकबरे येथे आढळतात. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अशाच एका प्राचीन कबरीखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की, पूर्वी संपूर्ण जगात केवळ हिंदु धर्म होता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये कबरीचा एका फोटो शेयर करून हिंदीतून लिहिले की, मुस्लीम देश इजिप्तमध्ये कबरीखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या. हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. जगात कोणत्याही ठिकाणी उत्खनन केल्यावर हिंदु मंदिरे आणि मूर्ती सापडतात. यावरून हे सिद्ध होते की, प्राचीन काळी संपूर्ण जगात केवळ हिंदु धर्मच होता.

तथ्य पडताळणी

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर दि सन आणि मेट्रो यूके वेबसाईटवरील एक बातमी प्रामुख्याने समोर आली.

15 डिसेंबर 2018 रोजी प्रकाशित या बातम्यांनुसार, इजिप्तची राजधानी कैरापासून जवळ असणाऱ्या सक्कारा प्रांतामध्ये 4400 वर्षे जुनी कबर सापडली. पुरातत्व संशोधकांनी ही कबर पुजाऱ्याची असल्याचे मत व्यक्त केले. इजिप्तचे सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुस्तफा वाझिरी यांनी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली.

मूळ बातमी येथे वाचा – मेट्रो यूकेअर्काइव्हदि सन 

वेबसाईटवरील बातमीमध्ये या कबरीचे विविध फोटो दिलेले आहेत. बीबीसीच्या (हिंदी) बातमीनुसार, इ.स.पूर्व 2,500 ते 2,350 मधील पाचव्या राजवंशाच्या काळातल्या या कलाकृती आहेत. सर्वोच्च प्रवर्गातील धर्मगुरुंना अशा आलिशान कबरीमध्ये ठेवले जात असे. ही कबर अशाच एका उच्च धर्मगुरूची आहे. कबरीच्या भिंतीवर मूर्ती आणि चित्रलिपी चितारण्यात आलेली आहे. काही ठिकाणी असेलेल्या चित्रांमध्ये मालकाची आई, पत्नी, आणि इतर नातेवाईक दिसतात.

मूळ बातमी येथे वाचा – बीबीसी हिंदीअर्काइव्हडीडब्ल्यूअर्काइव्ह

पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी या कबरीमध्ये हिंदु मंदिर किंवा देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्याचे म्हटलेले नाही. पोस्टमधील फोटोत जी व्यक्ती दिसत आहे, ते म्हणजे इजिप्तच्या पुरातन वस्तुंविषयीच्या सर्वोच्च परिषदेचे सरचिटणीस मुस्तफा वाझिरी आहेत. त्यांनी या शोधाची पत्रकारांना माहिती दिली व त्यांना कबरीची सफर घडवून आणली. यामध्ये त्यांनी कुठेही हिंदु मंदिराचा उल्लेख केलेला नाही.

बीबीसी मराठीच्या बातमीनुसार, जमिनीखाली गाडल्या गेलेल्या ठिकाणावर ही कबर सापडली आहे. कदाचित त्यामुळेच इथला खजिना दरोडेखोरांपासून सुरक्षित राहिला आहे. कबरीच्या भितींवर प्राचीन इजिप्तच्या ग्रंथांमधली चित्रलिपी कोरली असू, रंग अजूनही सुरक्षित आहेत. वाझिरी यांचा कबरीबद्दल माहिती देतानाचा व्हिडियो ट्विटरवर उपलब्ध आहे.

अर्काइव्ह

ही कबर सकारा शहरातल्या प्राचीन दफनभूमीचा एक भाग आहे. मुस्तफा आब्दो हे या कबरीचे संशोधन प्रमुख आहेत. ही कबर 10 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 3 मीटरपेक्षा कमी उंचीची आहे. याच ठिकाणी इजिप्तमधले सर्वांत अलिकडच्या काळातील पिरॅमीड आहेत. या कबरीमधील मूर्ती आणि चित्रलिपी पाहायची असेल तर खाली दिलेला व्हिडियो पाहा.

निष्कर्ष

इजिप्तमध्ये गेल्या वर्षी 4400 वर्षे जुना मकबरा सापडला होता. या मकबऱ्यात कोणतेही हिंदु मंदिर अथवा देवीदेवतांच्या मूर्ती नव्हत्या. पाचव्या राजवंशाच्या काळातील पुजाऱ्याची ही कबर असून, तेथे भिंतीवर प्राचीन चित्रलिपी चितारलेली आहे. त्यामुळे इजिप्तच्या पुरातन मकबऱ्यात हिंदु मंदिर सापडल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:ARTI-FACT: इजिप्तमध्ये प्राचीन मकबऱ्याखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False