
2019 हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे सगळ्यांनाच निवडणुका कधी होणार याविषयी उत्सुकता लागली आहे. सर्वजण आपापल्या परीने निवडणुका कधी होणार याचा अंदाज बांधत आहेत. सध्या सोशल मीडियावर 2019 लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याचा मेसेज फिरत आहे. त्यामध्ये देशभरातील राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कधी निवडणुका होणार हे दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली आहे.
तसेच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार यासंबंधीदेखील व्हॉट्सअपवर मेसेज फिरत आहेत.

तथ्य पडताळणी
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची अधिकृत जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात तपासणी केली असता 9 मार्चपर्यंत लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. ते 10 मार्च रोजी जाहीर झाले. या सर्व पोस्ट 10 मार्च पूर्वीच्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे खोटे वेळापत्रक सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे आयोगाने याची गांभीर्याने दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याप्रकरणी पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, 17 जानेवारी 2019 रोजी दिल्ली पोलिसांना यासंबंधी तपास करून कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. द टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार भारती जैन यांनी ट्विटरवर या पत्राचा फोटो शेयर केला होता.
विशेष म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक म्हणून ज्या तारखा सांगितल्या जात आहेत, त्या मूळात 2014 साली झालेल्या लोकसभेच्या आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेले मूळ वेळापत्रक येथे पाहा – 2014 लोकसभा वेळापत्रक
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रकदेखील 2014 चेच आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील 2014 सालच्या वेळापत्रकातील पीडीएफमधील पान क्र. 36 चा खाली स्क्रीनशॉट दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 2014 लोकसभा निवडणूक कशी होणार हे दिले आहे.

मेसेज आणि वरील स्क्रीनशॉट यांची तुलना केली असता दोन्ही सारख्याच आहेत, असे आढळते.
निष्कर्ष
भारतीय निवडणूक आयोगाने 9 मार्च पर्यंत 2019 लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केलेल्या नव्हत्या. त्यामुळे या आधीच फिरवल्या जाणाऱ्या या पोस्ट असत्य आहेत. तसेच आयोगाने खोट्या तारख्या पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही पोलिसांना पत्र दिलेले आहे.

Title:तथ्य पडताळणीः खरंच 2019 लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
