लंडनमध्ये खरंच सावरकरांचा पुतळा आहे का? वाचा त्यांचे नातू काय म्हणाले

False सामाजिक

लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले की, तो तिथे बसवू नये म्हणून कन्झरवेटिव्ह पक्षाने वाद घातला. परंतु लेबर सरकारने सांगितले, “इंग्लंडच्या शत्रूंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, त्यातील सावरकर हे एक. इंग्लंड भाग्यवान राष्ट्र आहे, त्याला सावरकरांसारखा चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त व कमालीचा बुद्धिमान शत्रू मिळाला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सावरकरांचा लंडनमधील पुतळा कोणत्या चौकात आहे याचा पोस्टमधील मजकुरामध्ये कुठेही उल्लेख नाही. तसेच पोस्टमध्ये सावरकरांच्या फोटो दिला आहे, ना की या पुतळ्याचा. गुगलवरदेखील लंडनमध्ये असा काही पुतळा असल्याचा संदर्भ मिळाला नाही.

कायद्याच्या शिक्षणासाठी सावरकर जून 1906 मध्ये लंडनला गेले होते. तेथील इंडिया हाऊस नावाच्या इमारतीमध्ये ते राहायचे. (संदर्भ – Savarkar.Org)

फॅक्ट क्रेसेंडोने मग लंडनमधील सावरकरांच्या कथित पुतळ्याचा शोध घेण्यासाठी इंडिया हाऊसचा शोध घेतला. द ओपन युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, उत्तर लंडनच्या हायगेट या भागातील 65, क्रोमवेल अ‍ॅव्हेन्यू येथे इंडिया हाऊसची इमारत आहे.

गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यूवद्वारे तेथे पाहणी केली असता तेथे कोणताही पुतळा दिसला नाही. या इमारतीवर मात्र एक निळी पाटी आहे, ज्यावर सावरकरांचे नाव लिहिलेले आहे.
तुम्ही तो स्ट्रीट व्ह्यूव येथे पाहू शकता – गुगल मॅप

इंडिया टुडेने 31 मार्च 1989 रोजी दिलेल्या बातमीनुसार, इंडिया हाऊस या इमारतीवर सावरकर येथे राहायचे अशी पाटी लावलेली आहे. इंग्लिश हेरीटेज या संस्थेद्वारे लंडनमध्ये अशा निळ्या पाट्या लावल्या जातात. या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर याची सविस्तर माहिती दिली आहे. 1985 साली लावण्यात आलेल्या या पाटीवर VINAYAK DAMODAR SAVARKAR (1883-1966) – Indian Patriot and Philosopher lived here असे लिहिलेले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

ही पाटी लावत असतानाचा व्हिडियोदेखील युट्यूबवर उपलब्ध आहे.

महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, सर सय्यद अहमद खान, सर अरोबिंदो, जवाहरलाल नेहरू, रविंद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये जेथे राहायचे तेथे अशा निळ्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात अधिक येथे वाचा – स्क्रोलअर्काइव्ह

यानंतर आम्ही लंडनमधील पुतळे आणि स्मारकांची माहिती मिळवली. विकिपडियावर उपलब्ध यादीमध्ये सावरकरांच्या पुतळा दिलेला नाही. पिटर मॅथ्यूज यांनी लिहिलेल्या London’s Statues and Monuments या पुस्तकात लंडन शहरातील सर्व लहान मोठे पुतळे आणि स्मारकांची माहिती आहे. या पुस्तकातही सावरकरांचा लंडनमध्ये पुतळा असल्याचा उल्लेख नाही. हे पुस्तक येथे पाहा – गुगल बुक्स

आम्ही सावरकर अभ्यासक आणि वक्ते सच्चिदानंद शेवडे यांच्याशी संपर्क करून याविषयी विचारणा केली. लंडनमध्ये सावरकरांचा पुतळा नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. “मी स्वतः लंडनमधील इंडिया हाऊसला भेट दिलेली आहे. ही इमारत आता खासगी मालमत्ता आहे. तेथे सावरकर येथे राहायचे अशी पाटी लावलेली आहे. लंडनमध्ये कुठेही सावरकरांचा पुतळा नाही,” असे ते म्हणाले. तसेच इग्लंडमधील कन्झर्वेटिव्ह आणि लेबर पक्षांमध्ये पुतळ्यावरून मतभेद झाल्याचे वृत्तदेखील त्यांनी फेटाळले.

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनीदेखील लंडनमध्ये सावरकरांचा पुतळा असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, “लंडनमध्ये सावरकरांचा पुतळा नाही.”

निष्कर्ष

लंडनमध्ये सावरकरांचा पुतळा नाही, अशी माहिती सावरकरांचे नातू सात्यकी यांनी स्वतः दिली. तसेच लंडनमध्ये सावरकरांचे वास्तव्य असलेल्या इंडिया हाऊस इमारतीवर केवळ त्यांच्या नावाची पाटी आहे. त्यामुळे पुतळा असल्याचे वृत्त असत्य आहे.

Avatar

Title:लंडनमध्ये खरंच सावरकरांचा पुतळा आहे का? वाचा त्यांचे नातू काय म्हणाले

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False