सत्य पडताळणी : दाऊदला भारतातून पळून जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता का?

False राजकीय | Political

दाऊदला भारतातून पळून जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता, असा दावा बीड लोकसभा या फेसबुक पेजवरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

दाऊद इब्राहिमचे शरद पवारांशी नेमके काय संबंध आहेत, याची तथ्य पडताळणी आम्ही केली. याची माहिती शोधत असता ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचा एक व्हिडिओ आम्हाला सापडला. या व्हिडिओत जेठमलानी सांगत आहेत की दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला नजरकैदत ठेवावे, अशी त्याची मागणी होती. त्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते. ही 90 च्या दशकातील घटना आहे. पवारांनी ही बाब कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे सांगून हा प्रस्ताव फेटाळला होता.

शरद पवार यांनी स्वत: दाऊदच्या आत्मसमर्पणाचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता, असे इंडिया टूडेला सांगितले होते. इंडिया टूडेने 4 जुलै 2015 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते.

आक्राईव्ह लिंक

दाऊदचा विश्वासू साथीदार अशी ओळख असणाऱ्या छोटा शकीलने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दाऊदला 93 मध्ये भारतात परतण्याची इच्छा होती. पण आता तशी इच्छा नसल्याचे म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही मुलाखत 30 ऑगस्ट 2015 रोजी प्रसिध्द केली आहे.

आक्राईव्ह लिंक

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांचे आणि त्यांच्या काही सहकार्यांचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते. इंडिया टूडेने 15 जुन 2015 रोजी याबाबतचे वृत्त दिले होते. या आरोपांमध्ये पवारांनी दाऊद पळून जाण्याचा सल्ला दिल्याचे वाक्य मात्र कुठेही नाही.

आक्राईव्ह लिंक

आऊटलूक या मासिकाने 14 फेब्रुवारी 1996 रोजी व्होरा कमिटीच्या अहवालाच्या आधारे एक वृत्त दिले आहे. या अहवालात शरद पवार आणि काँग्रेसच्या काही तत्कालीन नेत्यांवर दाऊदशी संबध असल्याचा आरोप केलेला आहे. या वृत्तात कुठेही पवारांनी दाऊदला पळून दिल्याचा सल्ला दिल्याचे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

मुंबईचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनीही दाऊदचे शरद पवारांशी संबंध असल्याचे आरोप केले होते. पण त्यांनीही दाऊदला पवारांनी पळून जाण्यास मदत केली होती असे कुठेही म्हटलेले नाही.

झी न्यूजला एक एप्रिल 2014 रोजी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आपले दाऊदशी आपले कुठलेही संबंध असल्याचे नाकारले आहे.

निष्कर्ष

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला शरद पवार यांनी पळून जाण्याचा सल्ला दिल्याचे सिध्द होत नाही त्यामुळे हे वृत्त असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : दाऊदला भारतातून पळून जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False