
प्राप्तीकर विभागाने (इन्कम टॅक्स) नुकतेच देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये प्रामुख्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांचा समावेश होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या कारवाईनंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कमलनाथ यांच्या खासगी पीएच्या घरात 281 कोटी रुपयांची रोकड सापडली. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली.
पोस्टमध्ये पैशाने भरलेल्या बॅगेचा फोटो शेयर करीत म्हटले की, काँग्रेस आजवर बोंबलत आली आहे की, मोदी सरकारने काळा पैसा बाहेर आणला नाही. आणि आता जेव्हा कमलनाथच्या खाजगी PA च्या घरावर इन्कम टॅक्स खात्याने धाड टाकली, तेव्हा तिथे व्यवधान टाळण्यासाठी कमलनाथने मध्यप्रदेश पोलिसांची मोठी टीम पाठवली आहे. इनकम टॅक्स अधिकाऱ्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका बघता तिथे केंद्र सरकारला CRPF चे जवान पाठवावे लागले आहेत. फक्त 3 महिन्याच्या शासन काळात त्या घरात पहिल्या मोजणीत सापडलेला पैसा तब्बल 281 कोटी रुपये आहे. 3 दिवस झाले अजूनही मोजणी सुरू आहे. चोर गांधी परिवाराचे गुर्गे पद्धतशीर काम करत आहेत. मित्रांनो गप्प बसू नका. यावर बोलते व्हा. कॉपी पेस्ट शेअर करा.
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये कमलनाथ यांच्या खासगी पीएचे नाव आणि छापा कधी टाकला हे दिलेले नाही.
यासंदर्भात गुगलवर शोध घेतला असता लोकसत्ताची एक बातमी आढळली. त्यानुसार, दिल्लीच्या प्राप्तीकर विभागातील 300 अधिकाऱ्यांनी रविवारी (7 एप्रिल) पहाटे 3 च्या सुमारास 50 ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली होती. (अर्काइव्ह)
कोण आहेत प्रवीण कक्कर?
अमर उजालाच्या बातमीनुसार, प्रवीण कक्कर हे पोलिस अधिकारी होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आलेले आहे. 2004 साली नोकरी सोडून ते काँग्रेस खासदार कांतीलाल भुरिया यांचे खासगी सचिव झाले. नंतर कमलनाथ यांनी डिसेंबर 2018 मध्ये त्यांना स्वीय सचिव/ओएसडी म्हणून नियुक्त केले. (अर्काइव्ह)
यावरून कमलनाथ यांच्या खासगी पीए/स्वीय सचिव/ओएडीची ओळख निश्चित होते. पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ANI या वृत्तसंस्थेने 6 एप्रिल रोजी ट्विट आढळले. ते तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, प्राप्तीकर विभागातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक जोशी नामक व्यक्तीच्या भोपाळ (मध्यप्रदेश) येथील घरातून हे पैसे जप्त करण्यात आले.
याचाच अर्थ की, पोस्टमध्ये जो फोटो दिला आहे तो कमलनाथ यांच्या पीएच्या घरात सापडलेल्या पैशाचा नाही.
कोण आहे प्रतीक जोशी?
दैनिक भास्करच्या बातमीनुसार, प्रतीक जोशी हा शस्त्रांचा व्यापारी (आर्म्स डीलर) आहे. तो आणि त्याचा नातेवाईक अश्विन शर्मा हे दोघे प्रवीण कक्करच्या माध्यमातून डिलींग करायचे. जोशीच्या घरातून 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले. (अर्काइव्ह)
मग 281 कोटी रुपयांचा आकडा कुठून आला?
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान हवाला आणि करचुकवेगिरीच्या माध्यमातून पैसे जमविल्याच्या संशयातून प्राप्तीकर विभागाने इंदौर, भोपाळ, दिल्ली, गोवा यासह देशभरात 50 ठिकाणी छापे टाकले होते.
PTI या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, प्राप्तीकर विभागातर्फे मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे निकटवर्तींय आणि इतरांवर टाकलेल्या धाडींतून आतापर्यंत 14.6 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचबरोबर राजकीय, व्यापारी आणि सार्वजनिक अशा विविध क्षेत्रांतील लोकांच्या माध्यमातून 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जमा करण्याच्या रॅकेटचाही छडा लावण्यात विभागाला यश मिळाले.
मूळ बातमी येथे वाचा – पीटीआय । अर्काइव्ह
हिंदीतील अनेक वृत्तस्थळांनीदेखील यासंबंधी वृत्त दिले आहे. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, 281 कोटी रुपयांच्या बेहिशोबी देवाणघेवाणसंबंधीचे केवळ कागदपत्र अधिकाऱ्यांच्या हाती लागले. तेवढी रक्कम त्यांना मिळाली नाही. नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, 281 कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या रॅकेटची केवळ माहिती मिळाली.
मूळ बातम्या येथे वाचा – एबीपी न्यूज । अर्काइव्ह । एनडीटीव्ही । अर्काइव्ह । नवभारत टाईम्स । अर्काइव्ह
म्हणजेच मध्यप्रदेशातील धाडसत्रातून 281 कोटींची रोकड जप्त करण्यात आली नाही. केवळ 281 कोटींच्या रॅकेटचा छडा लागला आहे. प्राप्तीकर विभागाने 8 एप्रिलपर्यंत 14.6 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
प्राप्तीकर विभाग आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) सोमवारी (8 एप्रिल) प्रसिद्ध केलेले स्टेटमेंट तुम्ही खाली पाहू शकता. त्यात त्यांनी 281 कोटींच्या रॅकेटसंबंधी DETECT असा शब्द वापरला आहे. RECOVER किंवा FOUND असे म्हटलेले नाही.
मूळ स्टेटमेंट येथे वाचा – प्राप्तीकर विभाग । अर्काइव्ह
प्राप्तीकराच्या स्टेटमेंटमध्ये हे देखील म्हटले आहे की, 14.6 कोटी बरोबरच 252 मद्याच्या बॉटल, आणि वाघाचे कातडे मिळाले. अनेकांनी धाडीमध्ये जप्त केलेल्या वाघाच्या कातडी फोटो म्हणून खालील फोटो शेयर केला आहे.
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, हा फोटो नॅशल जियोग्राफिकच्या वेबसाईटवर 2014 साली उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.
धाडीमध्ये सापडलेल्या वाघ, हरीण, हरीण आणि चित्त्याच्या ट्रॉफिचा मूळ फोटो तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
पोस्टमध्ये दिलेला फोटो मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पीए प्रवीण कक्कर यांच्या घरात सापडलेल्या रकमेचा नाही. तो प्रतीक जोशी यांच्या घरातील आहे. तसेच प्राप्तीकर विभागाने घातलेल्या धाडींमध्ये 281 कोटी रुपये नाही तर 14.6 कोटींची रोकड जप्त केली आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:तथ्य पडताळणीः मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पीएच्या घरातून 281 कोटींची रोकड जप्त?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
