
सोशल मीडियावर सध्या कथितरीत्या भाजपने काढलेले एक पत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकात जातीवाचक भाषेचा वापर करण्यात आला आहे. ब्राह्मणेत्तर जातींविषयी आक्षेपार्ह मजकूर यामध्ये लिहिलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वादग्रस्त पत्रकाची सत्य पडताळणी केली.
व्हायरल पोस्टमधील पत्रकात नेमके काय म्हटले आहे?
पुणे शहराच्या ब्राम्हण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अस्मितेसाठी भारतीय जनता पार्टी नेहमी कटिबद्ध राहिली आहे. पुणे शहरातून मराठा बहुजन दलित लोकांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी भाजप नेहमीच ब्राम्हण समाजाच्या सोबत आहे. ब्राम्हण अस्मितेसाठी आम्ही जिजाबाई, शाहू, फूले चे फोटोही पायदळी तुडवल्या. मराठा बहुजन दलितांचा पुण्यातून नायनाट करण्यासाठी आपले मत भाजप आणि मित्र पक्षालाच टाकावे, असे पत्रकात म्हटले आहे.
सत्य पडताळणी
या पत्रकात भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. पहिल्या रांगेत तिसरा फोटो गोपीनाथ मुंडे यांचा आहे. तर दुसऱ्या ओळीमध्ये पहिला फोटो गिरिश बापट यांचा आहे. पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो नाही.
आम्ही भाजपच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाच्या व्यवस्थापक वैशाली वाघ यांच्याशी संपर्क साधाला. त्यांना सांगितले की, पत्रकात दुसऱ्या रांगेमधील चौथा फोटो भाजपचे पुणे पूर्व शहर प्रदेशाध्यक्ष विकास मतकरी यांचा आहे. ते 2011 साली पुणे शहर प्रदेशाध्यक्ष होते. आरोग्याच्या तक्रारीमुळे ते आता राजकारणात सक्रीय नाही. सध्याचे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष हे योगेश बोकावले आहेत त्यामुळे हे पत्रक आताचे नसून जूने आहे.
टाईम्स ऑफ इंडिया । अर्काईव्ह (May 29, 2011 )
फॅक्ट क्रेसेंडोने भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. भाजप नेते डॉ. राजेंद्र खेडकर यांनी सांगितले की, पत्रकात त्यावेळचे पुणे शहराचे भाजप अध्यक्ष विकास मतकरी, तसेच भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांचे फोटो आहेत. त्यामुळे मूळ पत्रक खडकवासला, पर्वती मतदारसंघाच्या बॉर्डर मधल्या एखाद्या गावातील आहे. त्या मूळ पत्रकाशी छेडछाड/एडिट करुन आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे. केवळ फोटो वापरुन पत्रकातील संपूर्ण मजकूर एडिट केलेला आहे. मूळ पत्रक हे 2009 ते 2012 या काळातील असावे. मूळ पत्रक 8-10 वर्षांपूर्वीचे असल्याने ते शोधून फॅक्ट क्रेसेंडोला पाठवून देण्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क साधला असता, भाजपने कधीही जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पत्रक काढलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ भाजपचे नाव वापरुन जाणिवपूर्वक द्वेश निर्माण करण्यासाठी कोणीतरी ही कृती केलेली आहे, अशी त्यांनी माहिती दिली.
या पत्रकाची टीव्ही 9 या वृत्तवाहिनीनेसुद्धा पडताळणी केली आहे. ती तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
वादग्रस्त पत्रकामध्ये हयात नसलेले गोपीनाथ मुंडे व इतर माजी पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरलेले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो नाही. भाजप नेत्याने मूळ पत्र 2009-12 दरम्यानचे असल्याचे सांगितले. या जुन्या पत्रकाला एडिट करून त्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा वादग्रस्त मजकूर वापरला आहे. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Title:सत्य पडताळणीः पुण्यात जातीयद्वेश पसरविणारे वादग्रस्त पत्रक भाजपने काढले का?
Fact Check By: Amruta KaleResult: False
