40 वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश? वाचा तथ्य

True आंतरराष्ट्रीय | International

येत्या 40 वर्षांमध्ये भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असेल, अशी बातमी सोशल मीडियावर प्रचंड शेयर केली जात आहे. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, 2060 मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. 2060 मध्ये भारतातील मुस्लिमांची संख्या 33 कोटी 30 लाख 90 हजार इतकी असेल. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

लोकमतने 3 एप्रिल रोजी ही बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये दिले की, सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत सध्या भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात 19 कोटी 48 लाख 10 हजार मुस्लिम लोकसंख्या आहे. 2060 मध्ये भारतातील मुस्लिमांची संख्या 33 कोटी 30 लाख 90 हजार इतकी असेल.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

हीच बातमी टीव्ही 9 मराठीनेसुद्धा दिली आहे. ती येथे वाचा – टीव्ही 9 मराठीअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

बातमीमध्ये अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. येत्या 40 वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या कशी वाढेल, याबद्दलचा आढावा प्यू रिसर्च सेंटरकडून घेण्यात आला आहे. 2060 मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम प्यू रिसर्च सेंटरचा (Pew Research Center) अहवाल तपासला. त्यांच्या वेबसाईटवर 1 एप्रिल 2019 रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. “सर्वाधिक ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्या असलेले दहा देश” असे या अहवालाचे नाव आहे. 2015 सालच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगात सुमारे 230 कोटी ख्रिश्चन आणि 180 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. येत्या चाळीस वर्षांत दोन्ही धर्मातील अंतर घटून दोन्ही धर्मियांची संख्या प्रत्येकी 300 कोटी होईल, असे म्हटले आहे.

हा अहवाल येथे वाचा – प्यू रिसर्च सेंटर अहवालअर्काइव्ह

अहवालानुसार, 2060 पर्यंत मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशियाला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर पोहचेल. अहवालातील आकडेवारीनुसार (2015), इंडोनेशियात 21.99 कोटी तर, भारतात 19.48 कोटी मुस्लिम राहतात. 2060 मध्ये भारतातील मुस्लिमांची संख्या 33 कोटी 30 लाख 90 हजार इतकी असेल.

द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रिलीजन – पॉप्युलेशन ग्रोथ प्रोजेक्शन 2010-2050 या रिपोर्टच्या आधारावर वरील आकडेवारी दिलेली आहे. 2015 साली इंडोनेशिया, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नायजेरिया, इजिप्त, इराण, टर्की, अल्जेरिया आणि इराक या दहा देशांत एकुण मुस्लिम लोकसंख्येच्या 65.2 टक्के लोक राहतात.

2060 साली, भारतात एकुण लोकसंख्येच्या 19.4 टक्के लोक मुस्सिम धर्मिय असतील. जगातील सर्वाधिक मुस्लिमदेखील भारतात असतील. त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक असेल. मग नायजेरिया, बांग्लादेश, इजिप्त, टर्की, इराण आणि अफगाणिस्तान यांच अनुक्रमे क्रमांक राहिल.

मूळ रिपोर्ट येथे वाचा – द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रिलीजनअर्काइव्ह

प्यू रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असेल; परंतु, तरीदेखील भारतात हिंदू हाच बहुसंख्य धर्म राहिल. 2050 सालापर्यंत जगात हिंदुची संख्या 138 कोटी एवढी राहील. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 17.22 कोटी मुस्लिम (14.23 टक्के) राहतात.

जनगणना 2011अर्काइव्ह

निष्कर्ष

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2060 सालापर्यंत भारतात मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या 33 कोटी 30 लाख 90 हजार इतकी असेल. यासह भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश ठरेल. त्यामुळे ही बातमी सत्य आहे. असे असले तरी, तेव्हादेखील भारतात हिंदु धर्म हा बहुसंख्य राहणार आहे.

Avatar

Title:40 वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश? वाचा तथ्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False