
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.
काय आहे दावा ?
12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हणतात की, “तुम्हाला ना विकाऊ माणस मिळतील ना लढाऊ माणस मिळतील तुम्हाला तुमच्या सारखीच माणस मिळतील रडाऊ.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 15 मार्च रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीतील आहे.
या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणतात की, महाविकास आघाडी एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते. तसेच माझी सध्या न्यायालयीन लढाई सुरू असून माझा देवावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे.
बीबीसी मराठीच्या युट्यूब चॅनलवर उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
वरील भाषण पाहिल्यावर कळते की, व्हायरल व्हिडिओ क्लिपमधील वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेले नाही.
मूळ व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळल नव्हतं का? हो कळलं होतं. तर मग तुम्ही त्यांना थांबवल का नाही? त्यावर मी म्हणाले की, “जी माणसं विकली गेली, त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई कशी लढू? “मला विकली गेलेली माणस नकोत, मला लढाऊ माणसं हवी आहेत.”
हे वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून शब्दांत फेरबदल केला गेला आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना “विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले नव्हते. त्यांच्या विधानाला एडिट करून चुकीचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
