पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या रंगावर टिप्पणी करत त्यांना आफ्रिकन म्हटले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या वक्तव्याचे एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, “ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील असतात. द्रौपदी मुर्मू सुद्धा आफ्रिकन आहे आणि त्यामुळे तिच्या त्वचेचा रंग काळा आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला पाहिजे.”

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, राष्ट्रपतींच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्या आफ्रिकेतील वाटतात आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला पाहिजे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारतात ज्यांचा रंग काळा आहे, त्यांनी 4 जूनच्या आधी त्यांचा रंग गोरा करावा. कारण नरेंद्र मोदींनी भारतात जे काळे आहेत त्यांना आफ्रिकन म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी तर आपल्या देशाच्या राष्ट्रपतींसाठी असे म्हटले आहे.”

मूळ पोस्ट – ट्विट | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, नरेंद्र मोदी 8 मे रोजी तेलंगणातील वारंगलमधील सभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.

भाजपने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून या भाषणाचा व्हिडिओ थेट प्रक्षेपित केला होता.

संपूर्ण भाषण पाहिल्यावर आपल्यावर लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींवर टिप्पणी करत नव्हते. ते राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करत होते.

नरेंद्र मोदी 43:50 मिनिटावर म्हणतात की, “आज मला कळले की, राजकुमार (राहुल गांधींचे) काका (सॅम पित्रोदा) अमेरिकेत राहतात. राजकुमार काका त्यांचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत आणि आजकाल क्रिकेटमधील तिसरे पंच आहेत. जर काही गोंधळ असेल तर ते थर्ड अंपायरला विचारतात, त्याचप्रमाणे जर राजकुमार गोंधळला असेल तर ते सल्ला घेतात.”

पुढे ते सांगतात की, “या राजपुत्राच्या तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक काकांनी एक मोठं रहस्य उघड केल आहे. ते म्हणतात की, ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील आहेत. याचा अर्थ त्यांनी त्वचेच्या रंगाच्या आधारे तुम्हा सर्वांना आणि माझ्या देशातील अनेक लोकांना अपमानीत केले. तेव्हाच मला समजले की त्वचेचा रंग पाहून त्यांनी असे गृहीत धरले की द्रौपदी मुर्मू देखील आफ्रिकन आहे आणि म्हणून जर तिच्या त्वचेचा रंग काळा असेल तर त्यांचा पराभव केला पाहिजे.”

एनडीटीव्हीने व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित विधान अहवालात नमूद करण्यात आला आहे. बातमीच्या शिर्षकमध्ये लिहिले होते की, “राजकुमाराचे काका अमेरिकेत… पंतप्रधान मोदींनी सॅम पित्रोदा यांच्या ‘काळ्या कातडी’च्या विधानाने राहुलची कोंडी केली.”

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वक्तव्य व्हायरल होत आहे.

सॅम पित्रोदा 

सॅम पित्रोदा एका मुलाखतीत म्हणतात की, “भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक बहुधा गोरे दिसतात आणि दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. असे असूनही काही फरक पडत नाही. आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत.”

या वक्तव्यनंतर बराच वाद झाला होता, तसेच अनेक भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.  मुळात सॅम पित्रोदा यांनी “दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात.” असे केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टिका करत होते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या रंगावर टिप्पणी करत त्यांना आफ्रिकन म्हटले का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered