
जर्मनीचा हुकूमशहा हिटलर भाषण देताना रडला होता, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ एडिट केलेला असून, हिटलर यामध्ये रडला नव्हता.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये हिटलर भाषण देत आहे.
“Because I Know somewhere deep down in my heart I still love you,” असे या व्हिडिओमध्ये ऐकू येते.
सोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “हिटलर पण रडला होता..!”
हाच व्हिडिओ ट्विटरवरदेखील शेअर करण्यात आला आहे. “हिटलर पण रडला होता, कसं काय सगळं सेम टू सेम जुळून येतंय काय माहीत, तसं असेल तर आनंदच आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
तथ्य पडताळणी
व्हिडिओतील आवाजावरूनच संशय येतो की, हा हिटलरचा आवाज नाही. मग आता मूळ व्हिडिओ ऐकूनच कळेल की, हिटलर यामध्ये नेमके काय म्हणाला होता.
हिटरलचे भाषणांचे अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर एक व्हिडिओ सापडला जो सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी मिळताजुळता आहे. यामध्ये हिटलरचा मूळ आवाज आहे.
अधिक शोध घेतल्यावर कळाले की, हा व्हिडिओ हिटलरने जर्मनीचा चॅन्सेलर झाल्यावर 10 फेब्रुवारी 1933 रोजी बर्लिन येथे केलेल्या भाषणाचा आहे.
अर्काइव्ह ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर हिटलरच्या या भाषणाचा संपूर्ण व्हिडियो इंग्लिश सबटायटलसह उपलब्ध आहे. यामध्ये हिटलरने नव्या जर्मनीची रुपरेषा लोकांसमोर मांडली होती.
वरील व्हिडिओच्या 28.12 मिनिटापासून पुढे आपण सध्या व्हायरल होत असेलल्या व्हिडिओतील भाग पाहू शकता.
यात हिटलर जर्मन भाषेत म्हणतो की –
Wir wollen nicht lügen und wollen nicht schwindeln! Ich habe deshalb … ich habe deshalb es abgelehnt, jemals vor dieses Volk hinzutreten und billige Versprechungen zu geben
मराठी भाषांतर –
“मला ना कधी खोटं बोलायचं, ना फसवणूक करायची आहे. म्हणून मी लोकांसमोर येऊन पोकळ आश्वासनं देत नाही.”
हे बोलताना हिटलर रडलादेखील नव्हता.
या भाषणाचा मूळ व्हिडिओ, मूळ ऑडिओ तसेच संपूर्ण भाषणाची जर्मन आणि इंग्रजी प्रत इंटरनेटवर उपलब्ध आहे. या भाषणाच्या क्लिप्स गेटी इमेजस, हॉलोकॉस्ट मेमोरियल म्यूझियम, आणि क्रिटिकल पास्ट या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहेत
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, हिटलर रडत असल्याची व्हायरल क्लिप बनावट आहे. हिटलरच्या मूल भाषणाला एडिट करून त्यात खोटा आवाज टाकण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये हिटलर रडत नसून नव्या जर्मनीची रुपरेषा सांगत आहे.

Title:FAKE VIDEO: हिटलर रडतानाचा तो व्हिडिओ बनावट आहे; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
