
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच पक्षावर टीका करताना भाजप ‘तोडा आणि राज्य करा’ हे धोरण घेऊन चालणारा पक्ष असल्याचे म्हटले, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये काँग्रेसची प्रशंसा करताना ते म्हणतात की ‘जोडा आणि विकास करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे आढळले.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण देताना म्हणतात की, “भाजप हा पक्ष ‘तोडा आणि राज्य करा’ अशी परंपरा जोपासतो; परंतु काँग्रेस ‘जोड आणि विकास करा’ ही परंपरा जोपासतो.”
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीवर्ड सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ मोदींनी 2014 साली केलेल्या भाषणाचा आहे. ANI वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ 3 एप्रिल 2014 रोजी शेअर केला होता. या ट्विटनुसार, नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षा टीका करताना म्हटले होते की, काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘तोडा आणि राज्य करा’ अशी आहे तर भाजप ‘जोडा आणि विकास करा’ या तत्वावर चालणारा पक्ष आहे.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ सापडला. मोदींनी 3 एप्रिल 2014 रोजी गाझियाबाद येथे हे भाषण केले होते.
खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये 12:55 मिनिटांवर नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणतात की, ‘तोडा आणि राज्य करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे. ‘जोडा आणि विकास करा’ ही आमची (भाजपा) परंपरा आहे.
मूळ व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओ यांची तुलना केल्यावर लक्षात येते की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपाची परंपरा असल्याचे म्हटलेले नाही.

Title:‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपची परंपरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
