
राजकीय सभा आणि बैठकांमध्ये गाजणारा ‘चौकीदार चोर है’चा नारा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही घुमत आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर मिळालेल्या नोटिशीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करून आपली बाजू मांडली.
यावरून सध्या सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेकांनी दावा केला की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर है’ म्हटले म्हणून सर्वोच्च न्यायालयात सपशेल माफी मागितली. न्यायालयात हात जोडून त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुक वरील पोस्टमध्ये रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. सोबत लिहिले की, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आपल्या “चौकीदार चोर है” या वक्तव्यावर हाथ जोडून माफी मागितली.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हे प्रकरण आहे हे समजून घेऊ. राफेल विमाने खरेदीप्रकरणी संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे ग्राह्य धरण्याचा सर्वोच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजी निर्णय दिला होता. त्याच दिवशी राहुल गांधी यांनी अमेठी येथून लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली की, “आता तर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा मान्य केलं की, चौकीदाराने चोरी केली. राफेल खरेदीप्रकरणी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे, यावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक महिन्यांपासून मी जे म्हणत होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायूसेनेचे 30 हजार कोटी रुपये चोरून अनिल अंबानी यांना दिले, त्यालादेखील न्यायालयाने मान्य केले.”
ही प्रतिक्रिया तुम्ही 1.28 मिनिटांपासून खाली पाहू शकता.
राहुल गांधी यांच्या या विधानांवर आक्षेप घेत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. राहुल गांधी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून न्यायालयाच्या तोंडी स्वतःचे विधान घालून अवमान केल्याचे त्यांनी म्हटले.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्स । अर्काइव्ह
सर्वोच्च न्यायालयानेदेखील याची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांना 15 एप्रिल रोजी नोटीस बजावून एका आठवड्यात स्पष्टीकरण मागितले. न्यायालयाने ‘चौकीदार चोर है’ असे आपल्या निर्णयात म्हटलेले नसताना राहुल गांधी यांनी कोर्टाच्या नावे ते विधान केल्याचे नोटिशीत म्हटले. (संदर्भः टाईम्स ऑफ इंडिया)
त्यानुसार राहुल गांधींनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (22 एप्रिल) प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की, निवडणूक प्रचाराच्या ओघात मी तसे बोलून गेलो. परंतु, माझ्या राजकीय विरोधकांनी जाणूनबुजून त्याचा विपर्यास करीत मी हेतूपूर्वक न्यायालयाने ‘चौकीदार चोर है’ असे म्हटल्याचा प्रचार केला. माझा तसा कोणताही इरादा नव्हता. कोणतेही न्यायालय तसे वक्तव्य करणार नाही, याची मला चांगलीच जाण आहे. न्यायालयाला राजकीय वादामध्ये नाहक खेचल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.

लाईव्ह लॉ (Live Law) या वेबसाईटने उपलब्ध करून दिलेले मूळ प्रतिज्ञापत्र येथे वाचा – प्रतिज्ञापत्र
प्रतिज्ञापत्रातील मजकुराविषयी सविस्तर येथे वाचा – बार अँड बेंच । अर्काइव्ह
राहुल गांधी यांनी आपल्या 28 पानी प्रतिज्ञापत्रात कुठेही माफी (Apology) असा शब्द वापरलेला नाही. त्यांनी स्वतःची विधाने न्यायालयाच्या तोंडी घातल्याबद्दल दिलगीरी/खंत/खेद (Regret) व्यक्त केला. वर्तमानपत्रांनीसुद्धा बातमी देताना दिलगीर/खेद/Regret असे म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह
लोकसत्ताने मंगळवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या बातमीत स्पष्ट लिहिले आहे की, चौकीदारच चोर आहे, हे आपले विधान न्यायालयाच्या तोंडी घातल्याबद्दल राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून खेद व्यक्त केला. याचाच अर्थ की, राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ या नाऱ्याविषयी माफी मागितलेली नाही.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता ई-पेपर
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरही नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पुन्हा ‘चौकीदार चोर है’ म्हटले. सोमवारी त्यांनी ट्विट केले की, 23 मे रोजी जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल की, कमलछाप चौकीदारच चोर आहे. न्याय तर होणारच. गरिबांना लुटून श्रीमंताची पोटं भरणाऱ्या चौकीदाराला शिक्षा मिळणारच. म्हणजे राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ या विधानावर कायम आहेत.
स्वतः याचिकाकर्त्या खासदार लेखी यांनीदेखील राहुल गांधी यांनी माफी न मागितल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी न्यायालयाने राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली. या प्रकरणावर सुनावणी 30 एप्रिल रोजी पुन्हा करण्यात येणार आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत । अर्काइव्ह
निष्कर्ष
राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर है’ या वक्तव्यासाठी माफी मागितलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी तसे विधान घातल्याबद्दल त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केवळ दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी हात जोडून माफी मागितल्याचा दावा असत्य आहे.

Title:FACT CHECK: राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यासाठी खरंच माफी मागितली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
