
निवडणुका झाल्यानंतरही विरोधी पक्षावरील टीका अजूनही सुरूच आहे. बुधवारी नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण समारंभ झाला. सोशल मीडियावर समारंभाच्या एका फोटोची सध्या खूप चर्चा सुरू आहे. यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, सोनिया गांधी यांना हात जोडून नमस्कार करत असून, बाजूला राहुल गांधी बसलेले आहे. या फोटोवरून राहुल गांधीना ज्येष्ठांचा आदर करता येत नसल्याची टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये वृत्तपत्राचे दोन कात्रणे शेयर केलेली आहेत. एकामध्ये नरेंद्र मोदी वाकून हात जोडून सर्वांना अभिवादन करताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोत सुषमा स्वराज सोनिया गांधींना नमस्कार करीत आहेत. बाजूला बसलेले राहुल गांधी त्यांना नमस्कार करत नाही, हे दाखविण्यासाठी त्यांच्या हाताकडे लक्ष वेधले आहेत. पोस्टमध्ये लिहिले की, कोणी नमस्कार केल्यानंतर दोन्ही व्यक्तींची प्रतिसाद देण्याची पद्धत पाहावी.
तथ्य पडताळणी
मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला यावेळी देशभरातील विविध पक्षांचे नेते, मुख्यमंत्री, उद्योगपती, खेळाडू, सिनेसेलिब्रेटी उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील यावेळी हजेरी लावली.
पोस्टमध्ये दाखविलेला फोटो वन इंडियाने ट्विट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.
या सोहळ्याचे वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. इंडिया टुडे वाहिनीने युट्यूबवर शपथविधी सोहळ्यात माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आगमनाचा व्हिडियो अपलोड केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. पहिल्या रांगेत बसलेल्या विविध मान्यवरांना अभिवादन करत-करत सुषमा स्वराज चालत येतात. त्यांना पाहून राहुल गांधी लगेच जागेवरून उभा राहून त्यांना हात जोडून नमस्कार करताना या व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसते. त्यांनी केवळ नमस्कारच नाही तर, उभे राहुल सुषमा स्वराज यांच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला.
मूळ व्हिडियो येथे पाहा – इंडिया टुडे
या व्हिडियोतील फ्रेम आणि पोस्टमधील फोटो यांची तुलना केली असता स्पष्ट होते की, सुषमा स्वराज यांनी आधी राहुल गांधी यांच्यापाशी आल्या. तेथे राहुल यांनी उभा राहून त्यांना नमस्कार केला. मग सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी व नंतर डॉ. मनमोहन सिंग यांना नमस्कार केला. त्यामुळे दुसऱ्या फोटोमध्ये राहुल गांधी नमस्कार करताना दिसत नाही.

निष्कर्ष
पोस्टमध्ये दिलेला फोटो राहुल गांधी यांनी नमस्कार केल्यानंतरचा आहे. त्याआधी ते सुषमा स्वराज यांना नमस्कार करताना दिसत नाहीत. या पोस्टमध्ये फोटोचा गैरअर्थ काढण्यात आला आहे, त्यामुळे तो असत्य आहे.

Title:FACT CHECK: सुषमा स्वराज यांनी नमस्कार करूनही राहुल गांधींनी त्यांना नमस्कार केला नाही का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
