
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी चुरशीच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन येत्या जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, अमेरिकेचे नवनिर्विचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या शपथग्रहण समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आमंत्रित केले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली.
का आहे दावा?
पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधी समारोहाचे मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण आहे!”

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह । अर्काइव्ह । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
अमेरिकीच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरू आहे. परंतु, राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी लागणाऱ्या किमान 270 जागांचा टप्पा बिडेन यांनी पार केल्यामुळे त्यांना विजेता गृहित धरण्यात येत आहे. परंतु, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप पराभव स्वीकारलेला नसल्यामुळे आणि निकालाविरोधात ते न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत बायडेन यांनी खरंच डॉ. मनमोहन सिंग यांना शपथविधी समारोहाचे आमंत्रण पाठविणे आणि तेसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून हे जरा शंकास्पद वाटते.
इंटरनेटवर शोध घेतला असता एकाही वृत्तस्थळाने याविषयी बातमी दिली नसल्याचे आढळले. “बायडेन यांचे मनमोहन सिंग यांना आमंत्रण” ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, तसे काही दिसत नाही.
म्हणून मग फॅक्ट क्रेसेंडोने डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यलयाशी संपर्क केला. डॉ. सिंग यांच्या कार्यालयाने व्हायरल होत असलेले दावे खोडत स्पष्ट केले की, “डॉ. मनमोहन सिंग यांना बायडेन यांच्या शपथविधीचे आमंत्रण मिळालेले नाही. अमिरेकेत आताच निवडणूक झाली असून, शपथविधी जानेवारी महिन्यात आहे. त्यामुळे इतक्या लवकर पाहुण्यांना आमंत्रित करण्याची ही वेळ नाही.”
यावरून स्पष्ट होते की, जो बायडेन यांनी मनमोहन सिंगा यांना आमंत्रण दिल्याची बातमी खोटी आहे.
शपथविधीला विदेशी पाहुण्यांना न बोलविण्याची प्रथा
अमेरिकेच्या सिनेटमधील Joint Congressional Committee on Inaugural Ceremonies (JCCIC) ही समिती राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी समारोहाचे आयोजन करते. अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी 20 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.
वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रणपत्र (Invitation) आवश्यक असते. सामान्य नागरिक त्यांच्या त्यांच्या भागातील सिनेटर कार्यलयातून ते मिळवू शकतात. राष्ट्राध्यक्षदेखील काही लोकांना खास आमंत्रित करतात.
परंतु ही विशेष आमंत्रणे इतर देशांतील नेत्यांना न देण्याची अमेरिकेत प्रथा आहे.
बराक ओबामा यांच्या शपथविधी सोहळ्याची वेळी तत्कालिन परराष्ट्र मंत्री कोन्डोलिझा राईस यांनी विविध देशांच्या अमेरिकेतील दूतावासांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, “इतर देशांमधील राजकीय नेते व सरकारी अधिकाऱी यांना शपथविधीला आमंत्रित न करण्याचा शिरस्ता आहे. त्या त्या देशांचे प्रतिनिधी म्हणून केवळ दूतावासाचे प्रमुख व त्यांचे जोडीदार (पती किंवा पत्नी) सोहळ्याला हजर राहू शकतात.”

मूळ पोस्ट – सॅन डिआगो युनियन ट्रिब्युन
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, जो बायडेन यांनी मनमोहन सिंगा यांना आमंत्रण दिल्याची बातमी खोटी आहे. डॉ. सिंग यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावले आहेत.

Title:जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
