
रुपा यादव नावाच्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने मोदी सरकार देत असलेला पुरस्कार नाकारल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या खासदाराच्या (प्रज्ञासिंग ठाकूर) पक्षाकडून मी पुरस्कार घेणार नाही, अशी भूमिका रुपा यादव यांनी घेतल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा फोटो शेयर केला आहे. सोबत लिहिले की, आईपीएस अधिकारी रुपा यादव यांनी मोदी सरकारकडून अॅवार्ड नाकारला. त्या म्हणाल्या, “शहीद हेमंत करकरे यांना वीरतेचा सर्वोच्च सम्मान मिळाला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित खासदार ज्या आतंकवादच्या आरोपी आहेत त्या करकरेजींना देशद्रोही आणि गद्दार म्हणतात. त्यांची पार्टी मला अॅवार्ड देण्याचे ढोंग करीत आहे. तर माझे आंतरमन मला इजाजत देत नाही.”
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो रुपा यादव महिलेचा नाही तर, कर्नाटकमधील आयपीएस अधिकारी रुपा दिवाकर मौदगुल यांचा आहे. हा फोटो त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजचा प्रोफाईल पिक्चर आहे. त्यांना डी. रुपा या नावाने ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील पहिली आयपीएस अधिकारी होण्याचा मान त्यांच्या नावे आहे. सध्या त्या तेथे पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विषयी अधिक येथे वाचा – विकिपीडिया । द विकेंड लीडर

डी. रुपा यांनी कोणता पुरस्कार नाकारला याविषयी जेव्हा सर्च केले तेव्हा गेल्या वर्षीच्या बातम्या समोर आल्या. डी. रुपा यांनी नम्मा बंगळुरू फाऊंडेशन या एनजीओतर्फे देण्यात येणारा एक पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात नाकारला होता. ही एनजीओ भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी स्थापन केलेली आहे. फाउंडेशनतर्फे डी. रुपा यांना सर्वोत्कृष्ट सरकारी अधिकारी पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले होते.
डी. रुपा यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. एनजीओच्या चेयरमनला पाठविलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, “माझी सदसद्विवेकबुद्धी हा पुरस्कार स्वीकारण्याची अनुमती देत नाही. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावत असताना सगळ्या राजकीय पक्ष आणि संस्थांशी अंतर राखणे अपेक्षित असते. हे अंतर ठेवले तरच तो कर्मचारी जनतेच्या नजरेत आपली स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा निर्माण करू शकतो. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार न घेणे संयुक्तिक ठरेल.”

मूळ बातमी येथे वाचा – द सियासत डेली । अर्काइव्ह
फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, डी. रुपा यांनी पुरस्कार राशी जास्त असल्यामुळे (दोन लाख रुपये) हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. परंतु, एनजीओने आपली बाजू मांडताना सांगितले की, डी. रुपा यांना पुरस्कार जाहीर झालेलाच नाही. डी. रुपा यांच्यावर आरोप करताना संस्थेने म्हटले की, पुरस्कार मिळवण्यासाठी रुपा यांचा पाठपुरावा सुरू होता.
यावरून हे सिद्ध होते की, डी. रुपा यांनी भारत सरकारचा नाही तर, भाजप खासदाराच्या एनजीओचा पुरस्कार गेल्या वर्षी नाकारला होता. त्यासाठी त्यांनी हेमंत करकरे यांच्या अपमानाचे कारण दिले नव्हते.
डी. रुपा यांच्याविषयी जेव्हा सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या तेव्हा त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खुलासा केला. त्यांनी दोन जून रोजी ट्विट केले की, मी हे स्पष्ट करते की, पोस्टमधील फोटो माझा जरी असला तरी माझे आडनाव यादव नाही. तसेच पोलिसांना पुरस्कार दिला जात नाही. आम्हाला राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाते. मला या पदकाने आधीच सन्मानित केलेले आहे.
डी. रुपा यांना पोलीस दलातील विशेष सेवेबद्दल 2017 साली राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णाद्रमुकच्या बडतर्फ नेत्या व्ही. के. शशिकला यांना बंगळुरू येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात येत असल्याचा प्रकार उघड केला होता. यापूर्वीदेखील त्यांना 2016 साली राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. दोन्ही वेळेस त्यांनी हे पदक स्वीकारले होते.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज-18 । अर्काइव्ह
निष्कर्ष
व्हायरल पोस्टमधील फोटो आयपीएस अधिकारी रुपा यादव यांचा नसून, कर्नाटकच्या पोलीस महानिरीक्षक डी. रुपा यांचा आहे. त्यांनी 2018 साली भाजप खासदाराच्या एनजीओचा पुरस्कार नाकारला होता. त्यामुळे हेमंत करकरे यांच्या अपमानाचे कारण देऊन त्यांनी भारत सरकारचा पुरस्कार नाकारण्याचा दावा खोटा ठरतो.

Title:या आयपीएस अधिकाऱ्याने खरंच मोदी सरकारचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
