Fact Check : मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले होते का?

False राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पाचव्या रांगेचा पास दिला गेल्यानं ते शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत, असा दावा करण्यात येत होता. मोदी सरकारने पवारांचा अपमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोणत्या रांगेचा पास देण्यात आला होता याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे खालील वृत्त दिसून आले. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीनेही असेच वृत्त दिल्याचे दिसून येते. या पासचे छायाचित्रही या वृत्तवाहिन्यांनी दाखवल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही वृत्तांमध्ये त्यांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याचे म्हटले आहे.

विविध वृत्तवाहिन्यांनी शरद पवारांचा पास दाखवला आहे. तो नीट पाहिल्यास त्यावर व्ही असे लिहिले असल्याचे दिसून येते. त्यामुळे शरद पवारांना रोमन लिपीतील हा पाच असल्याने पाचव्या रांगेत स्थान मिळाले असावे, असे वाटते.

याबाबत राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी आपल्या पर्सनल ट्विटर हॅन्डलवरुन एक ट्विट केल्याचे दिसून येते. या ट्विटद्वारे खुलासा करण्यात आला आहे की, व्ही या शब्दाचा अर्थ पाच असा नसून VVIP असा होतो. या ट्विटमध्ये हे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, V म्हणजे ती जागा जिथे अतिमहत्वाच्या व्यक्ती बसतात आणि ती पहिली रांग आहे. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी आपल्या पर्सनल ट्विटर हॅन्डलवरुन याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले होते का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False