धावपटू गोमतीला पैशाअभावी वेगवेगळ्या रंगाचे बूट घालून स्पर्धेत उतरावे लागले का?

False सामाजिक

भारतीय अ‍ॅथलीट गोमती मरिमुथू हिने आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याची असाधारण कामगीरी करून दाखविली. कतारची राजधानी दोहा येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या या स्पर्धेनंतर गोमतीचे नाव संपूर्ण देशभरात पोहोचले. तमिळनाडू येथील एक शेतकरी कन्या म्हणून तिचे हे देदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

तिच्याविषयी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, गरीब कुटुंबातील गोमतीकडे धावण्यासाठी चांगले बूट खरेदी करण्याचे पैसे नव्हते. तिला सरकारनेदेखील मदत केली नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या रंगाचे बूट घालून तिला शर्यतीत पळावे लागले. तरीदेखील तिने सुवर्ण पदक पटकाविले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमधील फोटोमध्ये गोमतीने विजयानंतर भारताचा झेंडा हाती घेतलेला आहे. तिच्या पायात दोन वेगवेगळ्या रंगाचे बूट दिसतात. सोबत लिहिलेले आहे की, ही आहे तमिळनाडूची गोमती. बूट घ्यायला पैसे नाहीत म्हणून वेगवेगळ्या रंगाचे दोन बूट घालून एशियन गेममध्ये धावली. तिने भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल जिंकून आणलंय. क्रीडामंत्री आणि आपल्या सरकारने तिला कोणतीही मदत केली नाही. मीडियानेसुद्धा ही बातमी दाखवली नाही.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम गोमतीने असे वेगवेळ्या रंगाचे बूट घातले होते का, याची खात्री करून घेतली. द हिंदू दैनिकाने गोमतीच्या विजयाच्या बातमीत पुढील फोटो दिला आहे. यामध्ये खरंच गोमतीच्या एका पायात निळा तर, दुसऱ्यात नियॉन ग्रीन रंगाचा बूट आहे. म्हणजे तिने असे बूट घातले होते तर. 800 मीटरची ही शर्यत तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

मग गुगलवर Gomathi Marimuthu Shoes असा शोध घेतला. तद्नुसार, न्यूज-18 तमिळनाडू चॅनेलला गोमतीने 26 एप्रिलला दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडियो आढळला. तमिळभाषेतील या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोच्या तमिळ भाषिक फॅक्ट चेकरने अनुवाद केला. मी फाटके बूट घालून शर्यत धावले, असे व्हिडियोचे शीर्षक आहे. यामध्ये तिने सांगितले की, मी फाटके बूट घालून शर्यतीत सहभाग घेतला.

यानंतर सोशल मीडियावर अनेक कयास लावण्यात येऊ लागले. सरकार दरबारी अशा प्रतिभावान गरीब खेळाडुंची नेहमीच हेळसांड होते, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. हा वाद वाढतच गेला. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःहून प्रतिक्रिया देत संभ्रम दूर केला.

द हिंदूच्या वेबसाईटवरील 29 एप्रिलच्या मुलाखतीत ती म्हणाली की, माझ्या फाटक्या बुटाविषयी माध्यमांमध्ये अनेक गोष्ट बोलल्या गेल्या. मी सांगू इच्छिते की, ते बूट माझ्यासाठी लकी आहेत. या बुटांबाबत मी भावनिक आहे. म्हणून अंतिम शर्यातीमध्ये मी ते घालून धावले. हीच बाब तिने न्यूज-18 वरील मुलाखतीतही सांगितली. ती तुम्ही येथे वाचा.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

गोमतीचे वडिल एक शेतकरी मजूर होते. तेच तिचे प्रशिक्षकदेखील होते. त्यांचे 2016 मध्ये निधन झाले. चार भावंडापैकी सर्वात लहान असणाऱ्या गोमतीचा लहानपणापासूनच खेळाकडे कल होता. वडिलांनीदेखील तिला खंबीर पाठिंबा दिला. मध्यंतरी तिला दुखापतही झाली. त्यामुळे काही वर्षे ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकली नाही. या मुलाखतीमध्ये तिने याबाबत खंतदेखील व्यक्त केली आहे.

थोडक्यात काय तर तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून नाही तर, गोमतीने तिच्या मर्जीने हे फाटके बूट घातले होते. पण ते वेगवेगळ्या रंगाचे का आहेत?

अशा प्रकारच्या बुटांना मिसमॅच शूज म्हणतात. अनेक अंतरराष्ट्रीय खेळाडू अशा प्रकारचे वेगवेगळे रंग असणारे बूट वापरतात. याविषयी तुम्ही अधिक ईएसपीएन आणि जेफरी लमॉर ब्लॉग येथे वाचू शकता. उदाहरण म्हणून नाईके कंपनीचे फ्री ट्रेनर 3.0 सिरीजचे बूट पाहू शकता.

निष्कर्ष

भारतीय धावपटू गोमती मरिमुथू हिने पैशाअभावी नाही तर, ते बूट तिच्यासाठी लकी असल्यामुळे घातले होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर असे मिसमॅच बूट घालणे एक सामान्य बाब आहे. त्यामुळे कोणी मदत न केल्यामुळे गोमतीवर वेगवेगळ्या रंगाचे बूट वापरण्याची पाळी आली, असे म्हणने चूक ठरते. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:धावपटू गोमतीला पैशाअभावी वेगवेगळ्या रंगाचे बूट घालून स्पर्धेत उतरावे लागले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False